सिंधुदुर्ग- जिल्ह्यात 2 ते 8 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी महत्वाच्या कामांसाठी शहराच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे आवश्यक भाग वगळता बाकी भागातील लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.
हेही वाचा - कोरोनावरील उपचारांसाठी अवाजवी बील घेणे पडले महागात; 'या' प्रसिद्ध रुग्णालया विरोधात गुन्हा दाखल
गेले साडेतीन महिने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील जनतेने जिल्हा प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. लॉकडाऊनचे सर्व नियम कसोशीने पाळले. मात्र प्रशासनाने जिल्ह्यात पुन्हा 2 ते 8 जुलै पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामांसाठी शहरात जाऊ शकत नाही. सामान्य जनता तसेच व्यापारी संघामध्येही प्रचंड नाराजी आहे. जिल्हयातील कणकवली व कुडाळ तालुक्यातील पिंगुळी वगळता सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, देवगड आणि वैभववाडी तालुक्यात कुठेही कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या निर्णयाचा फेरविचार करून, जेथे आवश्यक आहे तेथेच लॉकडाऊन करावे. उर्वरीत ठिकाणचे लॉकडाऊन रद्द करावे, अशी मागणी राजन तेली यांनी केली. या संदर्भात मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.