सिंधुदुर्ग - कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ आज कणकवली मुडेश्वर मैदान ते प्रांत कार्यालयापर्यंत आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भाजपाने ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे, आमदार नितेश हे मोर्चाच्या अग्रस्थानी होते. यावेळी चंद्रकांत पाटील आणि नारायण राणे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
'शेतीविषयी त्यांना काहीच माहीत नाही'
उद्धव ठाकरे यांना मी अनेकवेळा विचारले शेतीविषयी मात्र त्यांना काहीच माहीत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे काय, खासगी बाजार समिती म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही, अशी टीका पाटील यांनी केली. काँग्रेसने तीन वेळा हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना शक्य झाले नाही. 2017पासूनच आमचे सरकार असताना हा कायदा आम्ही लागू केला होता. त्यावेळी तीन महिने राज्यात व्यापाऱ्यांनी संप केला होता. मात्र पर्यायी व्यवस्था करून आम्ही शेतकऱ्यांचा माल विकला. पूर्वी 60 हजार कोटींची माल बाहेरच विकला जात होता. तर मार्केटमध्ये 40 हजार कोटींची माल येत होता. खरे तर मार्केटमध्ये 1 लाख कोटींचा माल आला पाहिजे, मात्र कायदा येण्याआधीच 60 हजार कोटींची माल बाहेर विकला जात होता, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मनात मोदींनी जागा मिळविली म्हणून त्यांना लोकसभेत आजचे बहुमत मिळाले आहे. 2024ला हे बहुमत वाढेल आणि आपले काय होणार हे काँग्रेसला माहित आहे. म्हणून त्यांनी मोदींना विरोध केला असल्याचे ते म्हणाले. आता 55 आहेत ते 5 खासदार होतील ही भीती काँग्रेसला आहे म्हणून ते मोदींना विरोध करताहेत. महाराष्ट्रातही हे तिघे जास्त दिवस एकत्र राहणार नाहीत. हिंमत असेल तर एकत्र लढा, असे सांगताना पुणे पदवीधरमध्ये काही मतदार हे पदवीधर नसल्याचे ते म्हणाले.
नारायण राणे यांची राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
खासदार नारायण राणे यांनी यावेळो राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांना शेतीतील काय कळते, असे यावेळी राणे म्हणाले. तर उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बसून घरात बसून सरकार चालवतात. सगळे बंद याला काय फरक पडतो. मुख्यमंत्री म्हणून मानधन मिळते. आणखी बरेच काही मिळते, आणखी बरेच काही याची फोड करून घ्या, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार गप्प आहे. मोदींनी मात्र कृषी विधेयकातून देशातील शेतकऱ्याला नवसंजीवनी दिल्याचे ते म्हणाले.
'उद्धव ठाकरेंनी खिशात दमडी तरी टाकली का?'
कोरोनाच्या काळात आलेल्या कोरोनसह संकटात पंतप्रधान किसान योजनेतून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सावरले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिशात दमडी तरी टाकली का? असा प्रश्न यावेळी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केला. शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी 3 लाखाचे पॅकेज जाहीर केले. मत्स्य उद्योगासाठी 15 हजार कोटींची पॅकेज दिले. शेतकऱ्यांसाठी कृषी उत्त्पन्न बाजारसमित्या केल्या होत्या त्या शेतकऱ्याच्या कर्दनकाळ केले. त्यांच्या बेड्यातून या विधेयकामुळे शेतकऱ्यांची सुटका झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने शेतीच्या कराराचा कायदा महाराष्ट्रात केला. मात्र तेच काँग्रेसवाले मोदींवर टीका करत आहेत. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनांचे समर्थन मात्र त्याच्यातून फुटलेले राजू शेट्टी मात्र विरोध करताहेत. सिंधुदुर्गात भात, फळ यांच्यासाठी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन व्हावी, असेही ते यावेळी म्हणाले.
कोकणातील ही पहिली ट्रॅक्टर रॅली
आमदार नितेश राणे म्हणाले विधेयकाच्या समर्थानासाठी कोकणातील ही पहिली ट्रॅक्टर रॅली आहे. कोकणातला आंबा मोठ्या बाजारपेठेत विकला जाऊ शकतो, दोडामार्गचा काजू गुजरातला विकला जाऊ शकतो ही ताकद या विधेयकात आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विधेयकाची ताकद कळल्यानेच या मोर्चात महाराष्ट्रातला शेतकरी उतरला नाही. इथला शेतकरी या विधेयकाकडे आशेने पाहतोय. हे विधेयक नेमके काय आहे हे शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.