सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील कोलमडलेल्या एसटी सेवेवरून भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी एसटी सेवा सुरळीत न झाल्यास जिल्ह्यातील एसटी डेपो बंद आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील सेवा पूर्णपणे बंद पडली असून त्याचा परिणाम सामान्य माणसांना भोगावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील ३०० एसटी चालक-वाहक मुंबईमध्ये ठाणा शहरात पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये वेंगुर्ले आगारातील ५२ चालक-वाहकांचा समावेश असून त्यामुळे ४५ पैकी केवळ ८ फेऱ्या सुरू आहेत. तर कणकवली आगारातून ८० चालक-वाहक गेल्याने ५० टक्के फेऱ्या बंद आहेत. एसटीचे कर्मचारी, चालक-वाहक मुंबईत पाठवल्याने नागरिकांना फार मोठा भुर्दंड ठाकरे सरकार घालत आहेत. ज्या कोकणामुळे सत्तेत बसलात त्याच्या मुळावर शिवसेना उठत आहे, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. कणकवली येथील भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची राहील
मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे प्रमाण वाढत असून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचा प्रसार झाला तर प्रशासन जबाबदारी घेणार का? इथल्या लोकांना मुंबईत सेवा का? कर्मचाऱ्यांना पुन्हा १५ दिवस पाठवत आहेत. चार दिवसांत ग्रामीण भागातील फेऱ्या चालू न केल्यास आंदोलन उभे राहील; त्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची राहील. जिल्ह्यातील सगळ्या फेऱ्या पूर्ववत करा; अन्यथा होणाऱ्या परिणामास एसटी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा राजन तेली यांनी दिला. सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील ५० टक्के पेक्षा जास्त एसटी फेऱ्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे जनतेला जास्तीचे पैसे मोजून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. शाळा सुरू झाल्या मात्र विद्यार्थी शाळेत पोचू शकत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. याकडेही त्यांनी बोलताना लक्ष वेधले आहे.