सिंधुदुर्ग - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थांनी बंदी आणली आहे. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पर्यटन बंदीचे आदेश काढत यावर शिक्कामोर्तब केले आहे. जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली धबधब्यासह 11 ठिकाणांवर जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यापाठोपाठ आता पावसाळी पर्यटनाचा हंगामही कोरडा जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. विषाणू प्रसाराला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मांगेली, तिलारी धरण, कोनाळकट्टा, बाबा धबधबा, कुंभवडे, आंबोली धबधबा, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, धामापूर तलाव, कासारटाका, सावडाव धबधबा, शिवडाव धबधबा या ठिकाणी वैयक्तिक किंवा सामुदायिकरित्या एकत्र येण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. पोलीस प्रशासन, तालुका दंडाधिकारी, ग्रामपंचायत व इतर विभागांनी काटेकोरपणे या आदेशांची अंमलबजावणी करावयाची आहे. या आदेशाचा भंग केल्यास साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार गुन्हा नोंदवला जाईल.
कोरोनाने देशात शिरकाव केल्यानंतर केंद्राने 16 मार्चपासून लॉकडाऊन घोषित केले. मे महिन्यापर्यंत हे लॉकडाऊन राहिले. मे महिना सिंधुदुर्गमधील पर्यटन व्यवसायाच्यादृष्टीने बहराचा कालावधी असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे पर्यटक जिल्ह्यात फिरकले नाहीत. परिणामी उन्हाळी हंगाम कोरडा जाऊन जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. हा हंगाम गेल्यानंतर पावसाळी हंगाम तरी चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनाची दहशत कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा स्थिरावलेला आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन बंदीचे आदेश काढले आहेत.