पणजी - केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज सकाळी उत्तर गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते. दरम्यान लसीकरण सुरक्षीत असून, प्रत्येकाने लसीकरण करावे तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले आहे.
गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली
दरम्यान, गोव्यातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज एकाच दिवशी तब्बल 527 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. आज 138 जणांनी कोरोनावर मात केली असून, गोव्यात रुग्ण बरे होण्याचा दर 93.86 टक्के एवढा आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
राज्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर वापरावे, सोशलडिस्टन्सिंगचे पालन करावे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - बीड जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्त; 'या' पाच जणांची केली निवड