सिंधुदुर्ग - कणकवली शहरातील पटवर्धन चौकात सेवा बजावत असताना वाहतूक पोलीस हवालदार विश्वजित परब आणि हवालदार चंद्रकांत माने, नगरपंचायत कर्मचारी प्रविण गायकवाड यांच्या अंगावर एका अल्पवयीन युवकाने पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्लास्टिक बाटलीतून आणलेले पेट्रोल त्या युवकाने हवालदार परब आणि हवालदार माने यांच्या डोक्यावर ओतत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. नियम मोडल्याने दडांत्मक कारवाई केल्याच्या रागातून त्याने हा प्रकार केला आहे. संशयित युवक हा १७ वर्षे ६ महिन्याचा अल्पवयीन आहे, तो वडाचापाट, कुळकरवाडी, तालुका मालवण येथील आहे. या घटनेनंतर पोलीस विभाग हादरला आहे. कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, कणकवलीचे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी कणकवली उपजिल्हा रुग्नालयात धाव घेतली व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. विशेष म्हणजे पोलिसांवर पेट्रोल ओतल्यानंतर आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न करत असतानाच बाजूला उभे असलेल्या आरोग्यसेवक भालचंद्र साळुंखे याने त्या युवकाला तत्काळ पकडले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
सदरचा अल्पवयीन तरुण हा माथेफिरू असल्याचे स्पष्ट
सदरचा अल्पवयीन तरुण हा माथेफिरू असल्याने पोलीस व नगरपंचायत कर्मचारी विनामास्क विरोधात कारवाई करतात म्हणून आलेल्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. कणकवली पटवर्धन चौकात शनिवारी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक पोलीस विश्वजीत परब व चंद्रकांत माने हे पटवर्धन चौकात कार्यरत होते. तर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी प्रवीण गायकवाड, रवी महाडेश्वर हे कार्यरत होते. याच दरम्यान डीपी रस्त्याकडील सर्विस रोडने विरुद्ध दिशेकडून पटवर्धन चौकाकडे येत असलेल्या या अल्पवयीन आरोपीला वाहतूक पोलिसांनी पटवर्धन चौकात अडवले. त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे मागणी करण्यात आली. मात्र, त्याच्याकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नसल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. तसेच त्यांनी पोलिसांना उलटसुलट उत्तरे देत उडवाउडवी केली. त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग व विना परवाना वाहन चालवणे या प्रकरणी या तरुणावर ई-चलनाद्वारे पेंडिंग दंडात्मक कारवाई केली. याच दरम्यान त्या तरुणाकडे मास्क नसल्यामुळे नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड यांनी त्या तरुणाला दंड भरण्याची सूचना केली.
अंगावर पाठीमागून येत बाटलीतील पेट्रोल फेकले
दरम्यान, त्या तरुणाने आपली दुचाकी पटवर्धन चौकात ठेवत तो चालत निघून गेला. त्यामुळे पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपले नियमित काम सुरू ठेवले. साधारण २० मिनिटानंतर तो तरुण एका बाटलीतून पेट्रोल भरून घेऊन येत पटवर्धन चौकाच्या दिशेने पाठ करून उभ्या असलेल्या विश्वजित परब, चंद्रकांत माने, प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर पाठीमागून येत बाटलीतील पेट्रोल फेकले. यावेळी अचानक घडलेल्या या प्रकाराने हडबडून गेलेल्या पोलीस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणाने आपल्याकडील खिशात असलेली माचिस काढून काडी पेटवून या कर्मचाऱ्यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्य सेवक भालचंद्र साळुंखे याने त्या युवकाला मागून पकडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या हा आरोपी कणकवली पोलिसांच्या ताब्यात आहे.
आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी याप्रकरणी ड्युटीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करत त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही अशा घटनांना कुणीही पाठिशी न घालता सखोल तपास करून अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या तीनही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून हवालदार विश्वजित परब यांच्या डोळ्यात पेट्रोल गेल्याने डोळ्याला काही प्रमाणात इजा झाली. तर नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड यांच्या पाठीवर पेट्रोल ओतल्याने त्यांनाही इजा झाली आहे. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.