सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सापडेलल्या तिसऱ्या व चौथ्या कोरोनाबाधित रुग्णांचे फेरतपासणी अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. अहवाल निगेटिव्ह आले असले तरी या दोन्ही रुग्णांना अजून, जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले नाही. त्यांना अणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
देवगड तालुक्यातील वाडा गावामध्ये कंटेटमेंट झोन तयार करून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. तीन किलोमीटरच्या या कंटेटमेंट झोनमध्ये वाडा, नाडन आणि पुरळ या गावांचा समावेश आहे. या कंटेटमेंट झोनमध्ये एकूण 695 घरामधील 736 कुटुंबातील 3 हजार 59 व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये वाडा गावातील 352 घरांमधील 361 कुटुंबातील 1 हजार 519 नागरिक, नाडन गावातील 174 घरातील 231 कुटुंबातील 974 नागरिक व पुरल गावातील 169 घरांमधील 144 कुटुंबातील 566 नागरिकांचा समावेश आहे.
वाडा येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 1 हजार 74 व्यक्ती अलगीकरणात असून 745 व्यक्ती गृह अलगीकरणात तर 329 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 868 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यापैकी 817 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 5 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत 812 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 51 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 79 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6 हजार 338 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 5 कोरोना बाधीत रुग्णांपैकी तीन रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.