सिंधुदुर्ग – लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने अनेक मजूर, कामगार हे जिल्ह्यात अडकून पडले आहेत. या कामगारांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी आज दुसरी श्रमीक विशेष रेल्वे कर्नाटकातील यादगिरीकडे रवाना झाली. जिल्ह्यातून एकूण 1 हजार 535 मजूर व कामगार या रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना झाले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.
जिल्ह्यातील सात तालुक्यातील 1 हजार 535 कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 198 व्यक्ती 10 बसगाड्यांमधून, देवगड तालुक्यातील 450 व्यक्ती 22 गाड्यांमधून, मालवण तालुक्यातील 211 व्यक्ती 10 गाड्यांमधून, कणकवली तालुक्यातील 120 व्यक्ती 6 गाड्यामधून, सावंतवाडी तालुक्यातील 211 व्यक्ती 10 गाडीमधून, वैभववाडी तालुक्यातील 54 व्यक्ती 3 गाड्यामधून, तर वेंगुर्ला तालुक्यातील 291 व्यक्ती 15 गाड्या अशा एकूण 76 एस.टी बस मधून सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकात आणण्यात आले. या वाहतूकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले. तसेच सामाजिक अंतराचे पालन करत या सर्वांना त्यांची तिकीटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले. यावेळी प्रवाशांना ल्युपीन फौन्डेशनच्या माध्यमातून पाण्याची बाटली, मास्क, साबन व फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलाची विशेष कामगिरी..
गावाकडे जाण्याची आस त्यासाठी सुरु असलेली लगभग आणि रेल्वेत बसण्याची घाई यामध्ये गोंधळून गेलेल्या एक महिला मजूर रेल्वेत सामान ठेवण्यासाठी पुढे गेल्या होत्या. एस.टी. मध्ये असलेले उर्वरित सामान आणण्यासाठी बाहेर आल्यानंतर समोर एस.टी. न दिसल्यामुळे त्या घाबरुन गेल्या. यावेळी कर्त्यव्यावर असलेले सहायक पोलीस निरिक्षक श्री. ओटवणेकर व केराम यांनी या महिलेला धीर देत, संबंधित एस. टी. बस ओरोस फाटा येथे तातडीने थांबविली. तसेच, पोलीस दलाची खास गाडी पाठवून संबंधित महिलेचे सामान परत तिला मिळवून दिले.
यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक, स्टेशन मास्तर वैभव दामले आदी रेल्वेस्थानकावर उपस्थित होते.
रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांची बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकूणच पुरुष महिला, लहान मुले, वृद्ध आणि अपंग यांची घरी जाण्यासाठीची मोठी लगबग या ठिकाणी पहावयास मिळाली. शेवटी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी जिल्हा व पोलीस प्रशासन यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल कर्त्यव्यावर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानत त्यांचे मनोबल वाढवले.
हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेशासाठी चाकरमान्यांच्या वाहनांची 5 किमी रांग