सिंधुदुर्ग - गेले दोन दिवस बरसणाऱ्या पावसाने मसुरेसह इतर गावात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मसुरे मालवण मार्गावर रमाई नदीचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्याच प्रमाणे बागायत पूल येथे पुराचे पाणी आल्याने बेळणे कणकवली मार्ग सुद्धा बंद झाला आहे. मसुरे गावाला चारी बाजूने पाण्याचा वेढा असल्याने गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
मसुरे गावात पूरस्थिती
गडनदी दुथडी भरून वाहत असून मसुरे टोकळवाडी येथे नदीचे पाणी पात्राबाहेरून वाहत आहे. भगवंतगड कॉजवेवरती पाणी आल्याने बांदिवडे आचरामार्ग सुद्धा बंद झाला आहे. बागायत, वेरली, देऊळवाडा, मार्गाचीतड, मसुरे, मागवणे, कावावाडी, बांदिवडे, सैय्यद जुवा, भगवंतगड, खाजणवाडी आदी भागातील शेतीत पाणी भरल्याने भात शेतीची कामे खोळंबली आहेत. पाऊस वाढल्यास सायंकाळनंतर पाण्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मसुरे हे गाव खाडी किनारी असल्याने या भागात पुराचा मोठा धोका आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी नागरिकांनी घ्यावी असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
पुराचे पाणी बाजारपेठेत
मालवण बेळणे कणकवली मार्गावरील बागायत येथे पुराचे पाणी थेट बागायत तिठा येथील बाजारपेठेनजीक पोचले होते. वडाचापाट गोळवण मार्गावर वडाचापाट येथे तर पोईप धरणावर पाणी असल्याने हा मार्ग सुद्धा वाहतुकीस बंद झाला आहे. गडनदीला सुद्धा पूर आल्याने भगवंतगड कॉजवे पाण्याखाली गेला होता. तसेच पालयेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने बांदिवडेत पोहोचणारे रस्ते बंद झाले आहेत. नदीचे पाणी शेतीतून प्रवाहित होऊन वाहत असल्याने भात शेती लावणी वाहून जाण्याचा धोका आहे. पावसाचा जोर रात्रीपर्यंत कायम राहिल्यास मसुरेसह वेरळ, बागायत आदी भागातील शेतीचे नुकसान होणार आहे.
कावा वाडीला पुराचा धोका कायम
पावसाचा जोर वाढला की मसुरे आणि कावा वाडी परिसरात येणाऱ्या पुरामुळे येथील रहिवाशांना नेहमीच भीतीच्या छायेखाली वावरावे लागते. याबाबत शासनाने दखल घेऊन याठिकाणी संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी होत आहे. गतवर्षी या ठिकाणचा भूभाग खाडीने गिळंकृत केला आहे. अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना इथे झालेली नाही.
हेही वाचा - संभाजीराजे मराठा आरक्षणावरून पुन्हा आक्रमक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहले पत्र