सिंधुदुर्ग- मुंबई- गोवा महामार्ग दुरावस्थेप्रकरणी विरोधी पक्षाच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. महामार्गाच्या दुरावस्थेला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई- गोवा महामार्ग चौपदरी करण्यात येत आहे. मात्र महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे सामराज्य दिसून येत आहे. याचाच निषेध करण्यासाठी सर्व पक्षाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. महामर्गाच्या या कामात ठेकेदारांकडून निष्काळजीपणा झाला असून याला सरकारच जबबादार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. एस. एन. देसाई चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतली.
यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि स्वाभिमान पक्षाचे कार्यकते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनाच्या निमित्ताने हे पक्ष प्रथमच एकत्र आले होते. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मनाई आदेश लागू करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसा बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या आदेशाने बजावण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान आंदोलनाच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
विशेष म्हणजे या जेलभरो आंदोलनात पालकमंत्र्यांचे खंदे समर्थक सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर हेही सहभागी झाले होते. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.