सिंधुदुर्ग - काजू बियांचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मात्र, हमीभाव देण्याची बाब विचाराधीन आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत समिती स्थापना होईल, समितीच्या अहवालानंतर काजूला हमीभाव देण्याबाबत कार्यवाही करू, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. ते जिल्हा दौऱ्यावर आले होते.
कोरोना निर्बंधामध्ये शेतमाल वाहतूक, विक्री आदींना सूट
भुसे म्हणाले, कोरोना निर्बंधांमध्ये शेतमाल वाहतूक, विक्री आदींना सूट आहे. तरीही निर्बंधांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिकेल ते विकेल योजनेंतर्गत शेतमालाची थेट बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी राज्य शासन सुविधा उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांनीही ज्या पिकांची बाजारपेठेत मागणी आहे, ती पिके प्राधान्याने घ्यावीत जेणेकरून उत्पादनांना चांगला दर मिळेल, असेही ते म्हणाले.
वणवे लागून शेतकऱ्यांचे नुकसान
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, जिल्ह्यात बागायतींना वणवे लागून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. यात काजू, आंबा बागायतींच्या होणाऱ्या नुकसानीचे मूल्यांकन कृषी विभागामार्फत व्हायला हवे. कृषी योजना व इतर लाभासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चाळीस-पन्नास किलोमीटरवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावे लागतात. हे सर्वांनाच शक्य नाही. त्यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे. असे त्यांनी यावेळी भुसे यांच्या निदर्शनास आणले.