सिंधुदुर्ग - जिल्ह्यात प्रवेश मिळवण्यासाठी मुंबईहून ई-पास घेऊन आलेल्या चाकरमान्यांच्या वाहनांची 5 किलोमीटर रांग खारेपाटण जवळ जिल्ह्याच्या सीमेबाहेर उभी आहे. खारेपाटण पोलीस चेक पोस्टवर या वाहनांची तपासणी करून त्यांना पुढे सोडले जात आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी होत असल्याने मुंबईतून 9 तास प्रवास करून आलेल्या चाकरमान्यांना तब्बल 8 ते 9 तास थांबावे लागत आहे.
सध्या सिंधुदुर्गात चाकरमान्यांचा मोठा ओघ लागला आहे. आतापर्यंत 25 हजारहून अधिक चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ई-पास घेऊन जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात चाकरमानी दाखल होत आहेत. हे चाकरमानी स्वतः ची आणि भाड्याची वाहने घेऊन जिल्ह्यात दाखल होत आहेत. जिल्ह्याच्या खारेपाटण सीमेवरून मुंबई गोवा महामार्गाने दाखल होणाऱ्या या चाकरमान्यांची पोलीस यंत्रणेकडून तपासणी केली जाते.
लहान मुलांसोबत वयोवृद्ध आणि गरोदर माताही या चाकरमानी प्रवाशांमध्ये आहेत. रात्रभर 9 तास प्रवास करून जिल्ह्याच्या सीमेवर दाखल झालेल्या या चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश मिळविण्यासाठी तब्बल 8 ते 9 तास वाट पहावी लागत आहे. यात अनेकांनी सोबत आणलेले खाद्य खराब झाले असून यात लहान मुले व वयोवृद्ध लोकांचे मोठे हाल होत आहेत. सध्या जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यात प्रवासात खाण्यासाठी आणलेले खाद्य पदार्थ खराब होत असून या चाकरमान्यांना प्रशासनाने खिचडी दिली. दरम्यान पाणीही नसल्यामुळे अनेकांचे मोठे हाल होत आहेत. सध्या जिल्ह्याच्या सीमेवर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग आहे. ही रांग वाढत जात आहे. प्रशासनाने यातून मार्ग काढावा अशी मागणी चाकरमान्यांमधून होत आहे.