पणजी/सिंधुदुर्ग - गोव्यात ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल 76 रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झाला आहे. तर 2491 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. तसेच मे महिन्यात एकूण 454 रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला असल्याचीही माहिती आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आली.
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 30 एप्रिल ते 13 मेपर्यंत ऑक्सिजनअभावी तब्बल 454 कोविड बाधितांचा मृत्यू-
दरम्यान बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 30 एप्रिल ते 11 मेपर्यंत ऑक्सिजनअभावी 378 कोविड बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. यामुळे गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यानंतर 13 तारखेपर्यंत आणखी 76 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याने मे महिन्यात एकूण 454 कोरोनाबाधितांचा कोरोना अभावी मृत्यू झाला आहे.
ते पुढे म्हणतात, वैद्यकीय रुग्णालयात सुमारे 700 बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध असून सुमारे 953 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील १५० रुग्णांवर सुपर स्पेशलिटी ब्लॉकमध्ये उपचार सुरू आहेत. तिथे २० हजार लीटर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक उपलब्ध असून त्याचा वापर मुख्य गोमेकॉ इमारतीतील रुग्णांना होत नाही. या इमारतीतील रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरमधून दिला जात आहे. हे सिलिंडर ट्रॉली किंवा ५ क्युबिक मीटर आणि ७ क्युबिक मीटर क्षमतेच्या सिंलिंडरमधून भरले जात आहे. या सिलिंडर ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे रुग्ण दगावत असल्याचेही त्यांनी कोर्टात सांगितले.
गोव्यात गुरुवारी 2491 नव्या रुग्णांची नोंद
कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेपासून काहीकाळ सुरक्षित राहिलेल्या गोव्यात सध्या मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याचे पाहायला मिळते आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन लागू केले आहे. तरी सुद्धा गोव्यात हजारो कोरोना रुग्ण सापडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आजसुद्धा गोव्यात २४९१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
गोव्यात 24 तासांत 76 रुग्णांचा मृत्यू
गोव्यात फोफावत चाललेल्या कोरोना संक्रमणावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार उपाय करत आहे. गुरुवारी गोव्यात 2491 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर या नव्या रुग्णांसह राज्यात सध्या 32953 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गोव्यात गुरुवारी मागील २४ तासांत 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यासह एकूण मृत्यूचा आकडा 1950 वर पोहोचला आहे.