सिंधुदुर्ग – कुडाळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात एकूण 40 व्यक्ती आल्या आहेत. त्यातील 30 व्यक्ती अतिजोखमीच्या संपर्कातील असून 10 व्यक्ती कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. अतिजोखमीच्या संपर्कातील 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर आणखी 17 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
सोमवारी एकूण 11 अहवाल कोल्हापूर येथील तपासणी लॅबकडून प्राप्त झाले असून हे सर्वच अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या 4 कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील डामरे, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, मालवण तालुक्यातील हिवेळे आणि कुडाळ तालुक्यातील पणदूर या गावांचा समावेश आहे. पणदूर या नवीन कंटेन्मेंट झोनमध्ये पणदुर, हुमरमळा, आणाव या तीन गावांचा समावेश आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये 282 कुटुंबातील 1 हजार 341 व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकूण 22 हजार 8 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी 398 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर गावपातळीवर 21 हजार 610 व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 435 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 151 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 17 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 134 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 284 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 87 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 57 रुग्ण डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये, 30 रुग्ण डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत.
आरोग्य यंत्रणेमार्फत आतापर्यंत 4 हजार 180 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 17 कोरोनाबाधीत रुग्णांपैकी 7 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या 10 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 मे 2020 पासून आतापर्यंत एकूण 40 हजार 527 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.