कराड (सातारा) - कराडमध्ये चाकूने भोसकून आणि डोक्यात फरशी मारून एका तरुणाचा मंगळवारी (दि. 15) रात्री पावणे अकराच्या सुमारास निर्घृणपणे खून करण्यात आला. जुबेर जहाँगीर आंबेकरी (वय 32), असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. शहरातील गुरूवार पेठेतील भाजी मंडई परिसरात ही घटना घडली. सलग दुसर्या दिवशी झालेल्या हत्येच्या घटनेमुळे कराडकर हादरून गेले आहेत. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तिघा आरोपींचा समावेश-
जुबेर हा गुरूवार पेठेतील भाजी मंडईच्या परिसरात आला होता. त्यावेळी काही जणांनी जुबेवर चाकूने वार केला. आणि डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केले. या घटनेनंतर मंडई परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा मंडई परिसरात दाखल झाला. जखमी तरुणाला वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणातील हल्लेखोर पसार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. तत्कालिक कारणातून ही घटना घडल्याचे तसेच तिघांचा या हत्येमध्ये सहभाग असल्याची प्राथमिक माहिती निष्पन्न झाली आहे.