सातारा: खानापुरातील मुलीचे मागील तीन वर्षांपासून गावातीलच अभिषेक याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. मुलीच्या नातेवाईक आणि भावाने अभिषेकला समज दिली होती. तरीही त्यांच्या प्रेम संबंधात दुरावा आला नाही. यामुळे चिडून मुलीच्या भावाने मित्रांच्या मदतीने अभिषेक याचा खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
आरोपीच्या शोधात पोलीस : या प्रकरणातील संशयित रहीम रसूल मुलाणी (वय २०, रा. खानापूर, ता. वाई) आणि त्याचे दोन मित्र फरार आहेत. हाती आलेल्या तांत्रिक माहितीवरून पोलीस पथके संशयितांच्या शोधार्थ रवाना झाली आहेत. या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली असून तणावपूर्ण शांतता आहे.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह ताब्यात : तरुणाच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या खानापूर ग्रामस्थांनी संशयिताला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. मात्र, गावात तणावपूर्ण शांतता आहे.
घटनास्थळी पोलीस अधिकारी तळ ठोकून : हत्येच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, रमेश गर्जे, उपनिरीक्षक कृष्णराज पवार, स्नेहल सोमदे आणि वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी खानापूर गावात तळ ठोकला आहे.
साताऱ्यातही कोयता गॅंग सक्रिय : पुण्यातील कोयता गॅंगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या नंतरही कोयते नाचवून दहशत माजविणाऱ्यांना जरब बसलेली नाही. 22 जानेवारी, 2023 रात्री काही तरूणांनी हातात कोयते घेऊन साताऱ्यातील पोवई नाक्यावर दहशत माजवली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. कोयता गॅंगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या नंतरही कोयते नाचवून दहशत माजविणाऱ्यांना जरब बसलेला नाही, हे साताऱ्यातील घटनेवरून स्पष्ट होत आहे.
पोवई नाक्यावर दहशत: पोवई नाक्यावरील सयाजीराव हायस्कूलसमोर काही तरूण हातात कोयते घेऊन दहशत करत असल्याची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना तात्काळ ताब्यात घेतले तर पळून जाणाऱ्या तिघांना शिताफीने पकडले. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
कोयता गॅंगचा धुमाकूळ : उपनगरामध्ये कोयता गँगमधील गुंडांनी धुमाकूळ घालून हातगाड्या, दुकानांचे नुकसान करत दहशत माजवली होती. पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर पेन्शनर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातही कोयता गँग सक्रीय झाली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.