सातारा - कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये एका युवकाला खासगी मिनी बसने चिरडल्याची घटना घडली. वडील रुग्णालयामध्ये अॅडमीट असल्यामुळे त्यांच्या जवळ थांबलेला हा युवक मंगळवारी पहाटे रुग्णालयामधून बाहेरील रस्त्यावर आला. यावेळी तिथे भरधाव वेगाने आलेल्या एका खासगी मिनी बसने त्याला जोरदार धडक देऊन चिरडले. त्यात तो जागीच ठार झाला आहे. पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडली. योगेश भीमराव लगाडे (24) राहणार वारूंजी तालुका कराड असे या युवकाचे नाव आहे.
हेही वाचा... इथं ओरडण्यापेक्षा केंद्रात जाऊन ओरडा, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
कराड शहर पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, योगेश भीमराव लगाडे याच्या वडीलांना कृष्णा रुग्णालयामध्ये अॅडमीट केले होते. त्यामुळे रात्रभर तो वडीलांजवळ रुग्णालयामध्ये थांबला होता. मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास तो रुग्णालयामधून बाहेर आला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून तो पादचारी रस्त्यावर आला. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या एका खासगी मिनी बसने त्याला जोराची धडक दिली. त्यात तो बसखाली चिरडून जागीच ठार झाला. हवालदार प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातप्रकरणी मिनी बस चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा... 'सत्तेत असताना 'सामना' वाचला असता, तर सत्ताही वाचली असती'