सातारा - गडद गुलाबी रंगाचा गालिचा, त्याला निळ्या रंगाची झालर, ठिकठिकाणी उठून दिसणारी पांढरी गेंद, पिवळ्या रंगाची स्मितीया अशा नयनरम्य नजाऱ्यामुळे कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि त्यावर वैशिष्ट्यपूर्ण काटे असल्याचे भासणारी नाजूक कुमुदिनीच्या (पानभोपळी) फुलांनी कास पठारावरील कुमुदिनीचे तळे देश-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलंय. वातावरणातील बदलाचा परिणाम फुलांच्या मुबलकतेवर झाल्याचे मत वनस्पती अभ्यासकांनी नोंदवले आहे.
फुलांचा आणि पर्यटकांचा बहर -
गडद निळ्या रंगाची आणि त्यावर पांढरे ठिपके असलेली सीतेची आसवं, पिवळ्या रंगाची स्मितीया (कावळा), पांढरी गेंद व गुलाबी तेरडा अशा विविध रंगांच्या फुलांनी सध्या कास पठार आच्छादले आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या पुर्वसंध्येला फुलांनी आणि पर्यटकांनी कास पठार बहरले होते.
महाराष्ट्रातील फुलांची व्हॅलीत रंगाची मुक्त उधळण विदेशी पर्यटकांची हजेरी -युनेस्कोच्या जागतिक निसर्ग वारसा स्थळाचे कोंदलन साताऱ्याजवळच्या कास पठाराला लाभले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह पुणे- मुंबई- ठाणे, गुजरात राज्यातून एवढेच काय काही विदेशी पर्यटक कासला भेट देऊ लागले आहेत. अतिवृष्टीमुळे व पुरेसे ऊन न मिळाल्यामुळे यंदाचा हंगाम काहीसा लांबला. महिन्याभरापूर्वी येथील पर्यटनाचा मोसम सुरू झाला. पठारावरील बहुतांश रानफुलांचे आयुष्यमान 10 ते 15 दिवसांचे असल्याने पठार वरच्यावर रंग बदलत असते.
कास पठारावर आच्छादला फुलांचा गालिचा जणू रंगांचा उत्सव -निसर्गमित्र श्रीरंग शिंदे म्हणाले, गडद पिवळ्या रंगाची व त्यावर लाल दोन ठिपके असलेली "स्मितीया', निळ्या रंगाची सीतेची आसवं, तसेच गुलाबी रंगाच्या तेरड्याच्या फुलांनी जणू पठारावर गालिचा अंथरल्याचा आभास होतो. हे नयनमनोहर दृष्य पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. याशिवाय जरतारी, जांभळी मंजिरी, गवळण, ड्रॉसेरा, धनगरी गेंद, सायनोटीस, सोनकी आदी रानफुलेही पाहायला मिळतात, असेही त्यांनी सांगितले.
कास पठारावर आच्छादला फुलांचा गालिचा कुमुदिनीच्या फुलांची भुरळ -पठारावर, राजमार्गाला सुमारे दीड किलोमीटर अंतरावर कुमुदिनी तळे आहे. जांभ्या दगडात साठलेल्या पाण्यात तयार झालेल्या तळ्यामधील कुमुदिनीची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. स्थानिक भाषेत या फुलांना पानभोपळीची फुले म्हणतात. राज्य फूल "ताम्हण' या कुळातील ही पानवनस्पती आहे. जंगली शोभिवंत वनस्पती म्हणून ही वनस्पती लोकांच्या बागेत आणण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. "सायंकाळी चारनंतर कुमुदिनीची फुले मावळायला सुरवात होते. सकाळी सात ते दुपारी एक ही फुले पाहण्याची योग्य वेळ आहे,' असे कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष मारुती चिकणे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. कासचा फुलांचा हंगाम टिपेला असून देश-विदेशातील पर्यटकांची पावले पठारावरून हालत नाहीत. रानफुलांचा बहर सध्या टिपेला असून आणखी तो तीन आठवडे असाच राहील, असा स्थानिकांचा अंदाज आहे.
कास पठारावर आच्छादला फुलांचा गालिचा
ऑनलाइन बुकिंग करा अन् गैरसोय टाळा -
कास पठाराची विशिष्ट धारण क्षमता आहे. त्यापेक्षा अधिक पर्यटकांचा राबता पठारावर राहिल्यास अतिसंवेदनशील असलेल्या दुर्मिळ वनस्पतींना धोका संभवतो. त्यामुळे पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग प्रणालीचा वापर करून कास पठारावरील प्रवेश आगाऊ निश्चित करावा. Kas.ind.in या वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुकिंग करावे, असे आवाहन जावळीचे वनक्षेत्रपाल रणजितसिंह परदेशी यांनी केले आहे.
कास पठारावर आच्छादला फुलांचा गालिचा माहिती केंद्र उभारावे -वातावरण बदलाचा कासच्या दुर्मिळ रानफुलांवर परिणाम यावर्षी प्रकर्षाने जाणवत असल्याचे निरीक्षण लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक प्रा. शेखर मोहिते यांनी नोंदवले. कासला देश-विदेशातील पर्यटक येतात. युनेस्को साईट असल्याने तेथील वनस्पतींची शास्त्रोक्त माहिती पर्यटकांना एका ठिकाणी मिळाली पाहिजे. २०१२ मध्ये हे कास पठार वारसा स्थळ घोषित झाले. आज ११ वर्षे होऊनही माहिती केंद्र उभारता आले नाही हे दुर्दैव आहे. पर्यटकांना परिपूर्ण व शास्त्रोक्त माहितीसाठी माहिती केंद्र उभारावे, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.
कास पठारावर आच्छादला फुलांचा गालिचा का व कधीपासून साजरा केला जातो पर्यटन दिवस?
जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेटी देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.