सातारा : महिला विटंबने विरोधात आवाज उठवण्यासाठी परिवर्तनवादी संघटनांकडून 'द्रौपदीचे द्रौपदी तक' अशा आशयाची एक चळवळ राबविली जात आहे. याच अनुषंगाने साताऱ्यात स्वातंत्र्यदिनी परिवर्तनवादी संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांनी 'द्रौपदी से द्रौपदी तक' लिहिलेल्या साड्या नेसून ध्वजारोहण कार्यक्रमाला हजेरी लावली आणि मणिपूर घटनेचा निषेध केला.
आधुनिक युगातही महिलांचे वस्त्रहरण : पुराण काळात ज्याप्रमाणे द्रौपदीचे वस्त्रहरण करत महिलेची विटंबना केली गेली. त्याचप्रमाणे आजही आपल्या देशात महिलांची विटंबना होत आहे. आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान असतानाही, महिलांच्या अब्रूची लक्तरे तोडली जात आहेत. मणिपूरमध्ये घटना घडल्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सत्ताधारी त्या विरोधात काहीही बोलत नाहीत. याचा निषेध आणि जनजागृती म्हणून 'द्रौपदी से द्रौपदी तक' अशा आशयाची चळवळ तथा निषेध आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
देशभर चळवळीला सुरूवात : मणिपूर घटनेचा निषेध म्हणून महिलांवरील अत्याचार दर्शविणारी चित्रे रेखाटलेली साडी नेसून स्वातंत्र्यदिनी मणिपूर घटनेच्या निषेधार्थ चळवळ राबविण्यात आली. नवसर्जन ट्रस्ट, दलित फाउंडेशनसह देशभरातील अनेक सामाजिक व परिवर्तनवादी संघटनांचा या आंदोलनात पुढाकार घेतला. नवसर्जन ट्रस्टचे मार्टिन मकवान यांची मूळ कल्पना असलेली ही निषेध मोहीम दलित फाऊंडेशनचे संचालक प्रदीप मोरे व सहकाऱ्यांनी देशभर राबवायला सुरुवात केली आहे.
आम्ही गप्प बसणार नाही : महिलांची भर रस्त्यात अशी विटंबना होत असताना आम्ही गप्प बसणार नाही. हा देश गप्प बसणार नाही, असा संदेश या आंदोलनातून साताऱ्यातील परिवर्तनवादी चळवळीतील राष्ट्रीयता जागर अभियानाच्या कार्यकर्त्या सलमा कुलकर्णी-मोरे यांनी केंद्रातील सरकारला दिला आहे. मणिपूरच्या घटनेत एका महिलेच्या विटंबनेचा जल्लोष करण्यात आला. तरी देखील देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती काही बोलत नाही, ही बाब खूपच लाजीरवाणी असल्याचे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींना पाठवली साडी : या निषेध आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महिला राज्यपाल, महिला सांसद, महिला आमदार, चळवळीतील महिला पत्रकार आणि परिवर्तनवादी संघटनांमधील महिलांना 'द्रौपदी से द्रौपदी तक', अशा आशयाचे लिखान आणि महिला अत्याचाराची चित्रे रेखाटलेल्या साड्या पाठविण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्यदिनी त्या साड्या नेसून मणिपूर घटनेचा निषेध नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते, अशी माहिती सलमा कुलकर्णी-मोरे यांनी दिली.
हेही वाचा -