सातारा - देहविक्री करण्यास भाग पाडल्याप्रकरणी कोरेगावच्या महिलेला जिल्हा न्यायालयाने दोन महिने साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अंजली नरेश दास (वय ४०, रा. पश्चिम बंगाल) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
ऑक्टोबर 2016 मध्ये कोरेगावात ही घटना घडली होती. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कुंटणखाण्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान दोन महिलांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. जिल्हा न्यायालयातील चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी अंजली दासला अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम 4 अन्वये दोषी ठरवत दोन महिने साधी कैद व एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंड न दिल्यास 10 दिवसांची अतिरिक्त साधी कैद सुनावण्यात आली आहे.
सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. मंजुषा तळवळकर यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले. प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा-यांनी सहकार्य केले.