सातारा - कराड तालुक्यातील शेरे गावात मकर संक्रांत सणासाठी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमृता योगेश जगताप (वय 22 रा. वडगाव हवेली), असे मृत महिलेचे नाव आहे. अमृता यांचे गेल्या महिन्यात (22 डिसेंबर 2019) लग्न झाले होते.
वडगाव हवेली येथील योगेश जगताप यांच्याशी अमृता यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर मकर संक्रांतीच्या पहिल्या सणासाठी त्या माहेरी आल्या होत्या. कुटुंबातील सर्वजण बाहेरगावी गेले होते. दुपारी अमृता या कपडे धुण्यासाठी घराजवळच्या विहिरीवर गेल्या. मोटर सुरू करायला जात असताना पाय घसरून त्या विहिरीत पडल्या.
हेही वाचा - विहिरीत बुडून शेतकर्याचा मृत्यू; कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील घटना
कुटुंबीय घरी परतले असता त्यांनी अमृता घरी नसल्याचे पाहिले. कुटुंबीय अमृता यांचा शोध घेत असताना विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याप्रकरणी तानाजी जाधव यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.