सातारा - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खूनाला येत्या २० ऑगस्टला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या खूनाच्या सूत्रधारांच काय झाले ? त्यांना कधी पकडणार ? असा प्रश्न महाराष्ट्र 'अंनिस'ने राज्य सरकारला केला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याबाबत सरकारला प्रसिद्धीपत्रकातून प्रश्न विचारले आहेत. खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉक्टर विरेन्द्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे 2019 मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे, अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयितांविरुद्ध अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. या खुनाचा तपास डॉ. वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे.
हेही वाचा-पोलीस परीक्षेकरिता जिद्द: गर्भवती महिलेकडून 400 मीटर धावण्याचे अंतर 1.36 मिनिटांत पूर्ण
चारही खुनात समान संशयित
खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे, अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयित समान आहेत. तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरली आहेत. बंगळुरू येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालनुसार डॉ. दाभोलकर व काॅम्रेड पानसरे यांच्यावर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेल्या शस्त्रविषयक अहवालानुसार कॉ. पानसरे यांच्या खुनासाठी वापरलेले एक पिस्तुल प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनासाठीदेखील वापरल्याचे अंनिसने म्हटले आहे.
हेही वाचा-स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर असताना दिल्ली पोलिसांची कारवाई; चार जणांकडून 55 पिस्तुलांसह 50 काडतूस जप्त
केवळ खुन नसून दहशतवादी कृत्य
चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी 2020 मध्ये झाली. कर्नाटक 'एसआयटी'ने झारखंड राज्यातून ऋषिकेश देवडीकर या गौरी लंकेश खुनातील संशयिताला अटक केली आहे. तो तेथे पेट्रोल पंपावर काम करत होता. यावरून हे खून करणार्या गटाच्या यंत्रणेने किती लांबवर हात पसरले आहेत हे लक्षात येईल. 'सीबीआय'ने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात असे म्हटले आहे की, सदर खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आलेला आहे. त्यातून हे स्पष्ट झाले आहे, की ही फक्त खुनाची घटना नाही. तर हे दहशतवादी कृत्य आहे. ही पार्श्वभूमी पाहता डॉ. दाभोलकर यांच्या खूनाच्या सूत्रधारांचा शोध कधी लागणार? असा सवाल 'अंनिस'ने राज्य सरकारला केला आहे.
हेही वाचा-देशांतर्गत विमान प्रवास महाग! केंद्राकडून विमान तिकिट दरात 12.5 टक्क्यांची वाढ
मार्च 2020 मध्ये सीबीआयला पिस्तूल शोधण्यात आले होते यश-
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला मार्च 2020 मध्ये मोठं यश मिळाले. हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती लागले. ठाण्याजवळच्या समुद्री खाडीतून ते पिस्तूल शोधून काढण्यात सीबीआयला यश आले. नॉर्वेहून तब्बल सात कोटी ५० लाख रुपये खर्च करुन मागवण्यात आलेल्या डीप सी एक्सप्लोरर तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे पिस्तूल शोधले आहे. दाभोलकरांची २० ऑगस्ट २०१३ ला पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मारेकऱ्यांनी हत्येसाठी वापरलेले पिस्तुल ठाण्याजवळच्या खारगावमधे असलेल्या खाडीत टाकून दिले होते. डॉक्टर दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत ही माहिती सीबीआयला दिली होती. मात्र, खाडीच्या खोल पाण्यात पिस्तुलाचा शोध घेणे सोपे नव्हते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआयला त्याबाबत सातत्याने धारेवर धरले जात होते. त्यामुळे खोल पाण्यात शोध घेण्यासाठी दुबईमधील एका कंपनीला काम देण्यात आले होते. या कंपनीने नॉर्वेहून मागवलेल्या यंत्राच्या सहाय्याने पाण्याखाली विशिष्ट प्रकारच्या मॅग्नेटच्या सहाय्याने पिस्तुलाचा शोध घेण्यात आला.