कराड (सातारा) - कोयना धरणाच्या पाटलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणातील पाण्याची आवक कमी झाले आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे साडे पाच फूट करण्यात आले आहेत. पावसानेही उसंत घेतल्यामुळे पाटण आणि कराडमधील पूर ओसरत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
कराड, पाटणमधील पूर ओसरला...
कोयना धरणातील पाणीसाठा शनिवारी रात्री 10 वाजता 87.75 टीएमसी झाला असून गेल्या चोवीस तासात धरणात प्रतिसेकंद 64,894 क्यूसेक पाण्याची आवक झाली आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्यूसेक तर सहा वक्र दरवाजातून 28,421 क्यूसेक, असा एकूण 30,521 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. शनिवारी (रात्री 10 पर्यंत) कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 54 मिलीमीटर, नवजा येथे 48 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पाटण आणि कराड तालुक्यात पावसाने उसंत घेतली आहे. तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे पूर ओसरत आहे. कराड तालुक्यातील तांबवे पूल वाहतुकीस खुला झाला आहे. कराडच्या प्रीतिसंगम परिसरातील पुराचे पाणीही कमी झाले आहे. शनिवारी सकाळी कराड तालुक्यात तीन दिवसानंतर सूर्यदर्शन झाले. दिवसभर पावसाने उसंत घेतली.
कराड, सांगलीला दिलासा...
कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे तसेच धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. कोयना धरण परिसरातील पाऊस आणि धरणातून सोडल्या जाणार्या पावसामुळे कराडसह सांगली शहराला पुराचा धोका उद्भवतो. यंदाही पुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र, शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तसेच धरणातील पाण्याची आवक मंदावली. धरणातील विसर्गही कमी झाला. यामुळे कराड, पाटणमधील पूर ओसरला असून सांगलीमध्ये पुराची पातळी स्थिर आहे. एकूणच कराड आणि सांगली शहराला थोडा दिलासा मिळाला आहे.