सातारा- दारूचे पैसे देण्यावरून आठ जणांनी हॉटेल-बिअरबारमध्ये राडा करत वेटरच्या डोक्यात बाटल्या फोडल्या. त्यानंतर हॉटेल मालकाला मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि गल्ल्यातील रोख रक्कम, असा एकूण 86 हजारांचा ऐवजही लंपास केला. गुरूवारी रात्री खोडशी (ता. कराड) येथील पद्मा हॉटेलमध्ये ही घटना घडली.
याप्रकरणी हॉटेल मॅनेजर सुजित संजय पाटील (रा.आटके, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रोहित राजेंद्र काटवटे (रा. भोई गल्ली, कराड), मनीष रवींद्र शुक्ला (रा. सैदापूर, ता. कराड), जीवन शांताराम मस्के, राजू गणपती डवरी (दोघेही रा. शुक्रवार पेठ, कराड) व चार अनोळखी, अशा एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी (ता. कराड) येथे असलेल्या पद्मा हॉटेल व बिअरबारमध्ये आठ जण जेवायला गेले होते. दारूचे पैसे देण्यावरून त्यांनी वेटर सागर पाचपुते व सागर लोंढे यांना मारहाण केली. तसेच हॉटेल मालक रवींद्र जाधव यांच्या डोक्यात काचेच्या बाटल्याही फोडल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व गल्ल्यातील रोख रक्कम मिळून 86 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. हॉटेलच्या खुर्च्या, टेबल व काचा फोडून नुकसान केले. हॉटेलमध्ये राडा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. राडा करणार्या आठ जणांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
याप्रकरणी हॉटेल मॅनेजरने दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक सराटे पुढील तपास करत आहेत.