सातारा - गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे साताऱ्या जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने तेथील वेण्णा तलाव शुक्रवारी रात्री पूर्ण भरला. हा वेण्णा तलाव महाबळेश्वर-पाचगणीची लाईफलाईन मानला जातो. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच या वेण्णा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.
उशिरा आलेल्या मान्सूनमुळे महाबळेश्वरात पावसाला उशिरा सुरुवात झाली. एप्रिल अखेर या वेण्णा तलावातील पाण्याने तळ गाठला होता. कोकण, पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण भारताला महाबळेश्वरमध्ये पडत असलेल्या पावसाचा उपयोग होतो. मात्र, ऐन उन्हाळ्यात वेण्णा तलावातील पाण्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासह पर्यटनावरही याचा विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे एकूणच महाबळेश्वरसह पाचगणी नगरपालिका प्रशासन चिंतेत होते.
मात्र, काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शुक्रवारी मध्यरात्री हा तलाव पूर्ण भरला आहे. या तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 212.25 मिमी.पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये महाबळेश्वरमध्ये 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वर गिरीस्थान पालिकेकडून पूर्ण क्षमतेने भरलेल्या वेण्णा तलावाची ओटी भरुन पूजा करण्यात येणार आहे अशी माहिती, नगरपालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान, वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने बोटिंग, तसेच इतर स्थानिक व्यावसायिक व पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.