सातारा - जिल्ह्यात अवकाळी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेक पिके पाण्याखाली गेली, तर पालेभाज्या सडून गेल्या. शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांना सुध्दा याचा फटका बसला आहे. बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
पावसामुळे कांदा शेतातच नासून गेल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लसणाच्या भावाने प्रतीकिलो दोनशे रुपयांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. हिरव्या वाटाण्याचा भावही दीडशे रुपयांच्या घरात गेला आहे. भाज्यांचे भाव कडाडल्याने घरात कोणती भाजी बनवायची हा पेच गृहीणींसमोर निर्माण झाला आहे. सध्या गृहिणींनी स्वयंपाकात अंडी व डाळीचा वापर वाढवला आहे.
हेही वाचा - 'येथे' मटण ४२५ रुपये किलो; मटण दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन
पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वांग्याच्या झाडावर खोड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर कीडनाशक औषधाच्या कितीही फवारण्या केल्या तरीही कीड आटोक्यात येत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वांग्याचे उत्पादन घटले आहे. कोथिंबीर, पालक, चाकवत या पालेभाज्या पावसाने शेतातच सडल्या आहेत. ग्रामीण भागातून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी भाज्यांचे भाव भडकले आहेत. भाज्यांना चांगले दर असताना शेतात भाज्या नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. भाजी विक्रीतून दररोज येणारा पैसा थांबल्यामुळे घर चालवताना त्यांना कसरत करावी लागत आहे.
जिल्हा बाजारपेठेतील भाज्यांचे प्रती किलो भाव -
लसूण- 200 रु, वांगी- 120 रु, वाटाणा- 150 रु,
पावटा, कारली, भेंडी, घेवडा, कांदा, गाजर, ढोबळी मिरची, फ्लावर, कोबी- 80 रु,
बिट, हिरवी मिरची, टोमॅटो- 60 रु, आलं, गवार- 100 रु, भोपळा- 40रु
वाघा घेवडा- 80 रु, चाकवत- 40, शेपू ,पालक- 20 रु, कोथिंबीर- 15रु जुडी,
काकडी, बटाटा- 20 रु. किलो