कराड (सातारा) - कराड नगरपालिकेच्या करवसुली विभागाने बुधवारी भाजी मंडईतील 17 गाळे सील केले. गाळेधारकांकडून डिपॉझीटचे 22 लाख रूपये येणे बाकी असल्याने नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून नगरपालिकेतील कर विभागाने संपूर्ण करवसुली बंद ठेवली होती. मात्र, अनेक दिवसांपासून गाळेधारकांनी डिपॉझीटची उर्वरीत रक्कम भरली नाही. त्यानंतर वारंवार सूचना देवूनही गाळेधारक डिपॉझीटची रक्कम भरत नव्हते. त्यामुळे त्यांना 22 जूनला नोटीस देवून उर्वरित डिपॉझीट रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते. चार गाळेधारकांनी डिपॉझीटची रक्कम भरली. उर्वरीत गाळेधारकांचे 17 गाळे बुधवारी सील करण्यात आले.
दरम्यान, यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक उमेश महादर, लिपीक अल्ताफ मांगलेकर, पांडुरंग सपकाळ, गणेश दुबळे, विनोद भोसले, राजेश जाधव यांनी ही कारवाई केली.