सातारा- जिल्हा रुग्णालयातील मृत भृण प्रकरणात गर्भलिंग निदान झालेले मशीन सील व्हावे. गर्भपाताची औषधे बेकायदा विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई व्हावी. तसेच, या सर्वाला जबाबदार असणाऱ्या शल्यचिकित्सकांच्या पीसीपीएनडीटी कमिटीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक अॅड. वर्षा देशपांडे यांनी आज केली.
जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात सफाई कर्मचाऱ्याला मृतावस्थेत 2 भृण मिळाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मृतावस्थेत सापडलेले भृण मुलींचेच असून संबंधित मातेला ३ मुली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत, या मागणीसाठी लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी, साडेपाच महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भपात होणे हे बेकायदेशीर आहे. प्रशासनाने संबंधित माता, तिचा पती, गर्भपात करायला भाग पाडणारे सासरचे लोक आणि गर्भपाताची औषधे महिलांना बेकायदेशीररित्या देणारा दुकानदार, सोनोग्राफी करणारे डॉक्टर आणि या सर्वाला जबाबदार असणारे जिल्हा शल्यचिकित्सकांची पीसीपीएनडीटी सल्लागार समिती आणि स्वत:ह शल्यचिकित्सक यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वर्षा देशपांडे यांनी केली. एवढे सगळे होत असताना संबंधित आशाताईपासून पीसीपीएनडीटी सल्लागार समितीपर्यंत यंत्रणेनी मौन का बाळगले, असा सवालही त्यांनी केला. प्रशासनाने गांभिर्याने हे प्रकरण न हाताळल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठाऊ, असा इशाराही वर्षा देशपांडे यांनी यावेळी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली समिती
या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तात्काळ समिती नियुक्त केली असून 14 ऑगस्ट पूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशी समितीत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, महिला व बालविकास अधिकारी मनोज ससे, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्या विधी अधिकारी पुनम साळुंखे यांचा समावेश आहे.