कराड (सातारा) - कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षपुर्तीस केवळ 25 दिवस बाकी असताना धरणात अद्यापही 35 टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा आहे. कृष्णा पाणीवाटप लवादानुसार आरक्षित पाणी कोट्यापेक्षा यंदा अतिरिक्त दहा टीएमसी जादा पाणी वापरायला शासनाने परवानगी दिल्यामुळे वीजनिर्मिती अखंडित सुरु आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात राज्यावरील भारनियमनाचे संकट दूर झाले आहे.
तांत्रिक वर्षाच्या सुरूवातीला धरणात 12 टीएमसी पाणी होते शिल्लक - कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षाच्या सुरूवातीला जून महिन्यात धरणातील पाणीपातळी अत्यंत खालावली होती. धरणात केवळ 12 टीएमसी पाणी होते. मात्र, जून आणि जुलै महिन्यात कोयना पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या पंधरा दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्याने तब्बल ऐंशी टीएमसीपर्यंत मजल मारली. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून पाण्याचा मोठा विसर्ग करावा लागला. पुन्हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आणि गणेशोत्सवाच्या आगमनादिवशीच कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने शंभरी ओलांडली होती.
धरणात सध्या 35 टीएमसी पाणी शिल्लक - कोयना धरणाच्या पाण्यावर 2 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. 67 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तर 30 टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणीवाटप करारानुसार 1 जून ते 31 मे या कालावधीतील तांत्रिक वर्षासाठी हा करार असतो. यावर्षी 1 जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील तब्बल 11 महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ संपला असून आता केवळ 25 दिवस बाकी आहेत. तरीही धरणात 35.27 टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चालू वर्षीच्या तीव्र उन्हाळ्यातील सिंचन व वीजेची गरज भागवूनही आगामी तांत्रिक वर्षारंभी पाणीसाठा शिल्लक राहील, असे चित्र आहे. सध्या कोयनेतून अखंडित वीजनिर्मिती सुरू असून नवीन तांत्रिक वर्षात जून अखेरपर्यंत जरी पाऊस पडला नाही तरी वीजनिर्मिती सुरू ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे जनतेची भारनियममनापासून सुटका होणार आहे.
कोळसा तुटवड्यामुळे कोयनेच्या वीजनिर्मितीवर अतिरिक्त भार - कोयना धरणात सध्या 35.27 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शुक्रवारी (दि. 6 मे) सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणाची पाणीपातळी 2086 फूट आणि 635.813 मीटर होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 1050 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यावर वीजनिर्मिती सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात निर्माण झालेल्या कोळसा तुटवड्यामुळे कोयना जलविद्युत प्रकल्पावर वीजनिर्मितीचा अतिरिक्त भार पडला. त्यामुळे सरासरीच्या कितीतरी पटीने ज्यादा वीजनिर्मिती करण्यात आली. या अतिरिक्त वीजनिर्मितीमुळे ऐन उन्हाळ्यात कोयना वीजनिर्मितीला पाण्याचे चटके बसले. यावर्षी आत्तापर्यंत 3395.926 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली असून गतवर्षीच्या तुलनेत 691.157 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. कृष्णा पाणीवाटप लवादानुसार आरक्षित पाणी कोट्यापेक्षाही यंदा कोयना धरणातील अतिरिक्त दहा टीएमसी जादा पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्यास शासनाने परवानगी दिल्याने पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आजपर्यंत 71.99 टीएमसी पाण्यचा वापर झाला आहे तर अद्याप 5.51 टीएमसी पाणी कोटा शिल्लक आहे. येत्या पंचवीस दिवसांत या पाण्यावर कोयनेतून अखंड वीजनिर्मिती होणार आहे.