सातारा - बेरोजगार तरुणांना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बँकेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तब्बल एक कोटीची फसवणूक करून वर्षभरापूर्वी पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. निलेश महादेव कोकणी व सचिन केपन्ना तरपदार (वय - 34) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
साताऱ्यातील कोरेगाव, माण, जावळी, कराड, पाटण या तालुक्यातील बेरोजगार तरुण- तरुणींना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बँकेत नोकरी लावण्याचे आमिष देऊन हे भामटे पैसे लूटत होते.
तरुणांना कलकत्ता येथे नेऊन त्यांना बनावट नियुक्तीपत्र देखील देण्यात आली. यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी तीन ते पाच लाखांची रक्कम लाटण्यात आली. अशा प्रकारे जवळपास एक कोटी रुपयांनी त्यांनी बेरोजगारांना गंडा घातलाय. फसवणूक झालेल्या युवकांनी मागील वर्षी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, गुन्हा दाखल होताच संबंधित संशयित पसार झाले होते. या प्रकरणात काही आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्रही दाखल केले होते. परंतु हे दोघे पसार होते.
दरम्यान, निलेश कोकणी हा दोन दिवसांपूर्वी दहिवडी परिसरात आल्याची माहिती बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ यांना मिळाली. त्यांनी दहिवडीत सापळा रचून कोकणीला अटक केली. तर या गुन्ह्यातील दुसरा संशयित सचिन तरपदार हा पनवेलमध्ये असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने पनवेलला जाऊन तरपदारला अटक केली. या टोळीकडून आणखी कोणाची फसवणूक झालेली असल्यास बोरगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.