सातारा - खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नीरा-देवघरच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी स्वतःला भगीरथ म्हणून घेणाऱ्या व्यक्तींनी १४ वर्षात पाण्यासाठी अध्यादेश का काढला नाही. तुम्हाला देव माफ करणार नाही, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. ते आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
नीरा-देवघर डाव्या कालव्याचा वाद झाल्यानंतर राज्य सरकारने बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बुधवारी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी नीरा-देवघरचे पाणी सांगोला, माढा आणि फलटण शहराला वळवले. त्यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजेंनी पक्षाला घरचा आहेर देत निंबाळकर आणि गोरेंना एक प्रकारे आपले समर्थन दिले आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार, असे वक्तव्य केले होते. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी देखील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाणी देण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर बारामतीच्या पाणी वळवण्याचे आदेश काढण्यात आले. दरम्यान, बारामतीचे पाणी दुसरीकडे वळविण्यात आल्यानंतर शरद पवार कोणती भूमिका घेतील याकडे सातारा, माढा आणि बारामतीचे लक्ष लागून आहे. मात्र, उदयनराजेंनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वरती नाव न घेता टीका केली. यामुळे उदनराजे यांच्या भूमिकेमुळे विविध चर्चां रंगू लागल्या आहेत.