सातारा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याच्या एमआयडीसीत खंडणीखोरीमुळे उद्योग आले नाहीत, असा अप्रत्यक्षपणे निशाणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंवर साधला होता. त्याला आता उदयनराजे भोसलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री, संत्री कोण काय बोलले मला माहित नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात हिंमत असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा, असे आव्हान उदयनराजे भोसलेंनी अजित पवारांचा नामोल्लेख टाळून दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले की, आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात हिंमत असेल तर तुमची चौकशी ईडीला करायला सांगा. दोन लाखांची खंडणी घेतल्याचा फालतू आरोप करू नका. एखाद्याने चांगले काम करायचेच नाही का?. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की लुटारू आहात, हे एकदा ठरवा. सत्ता आज आहे आणि उद्या नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे काम आहे. ही लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील स्टाफही त्यांना ओळख देत नाही. पण, आपले तसे नाही, आपली 'स्टाईल इज स्टाईल', असे सांगताना त्यांनी कॉलर उडवली.
'त्यावेळी मी शाळेत होतो' - एमआयडीसीची स्थापना झाली. त्यावेळी मी तर शाळेत होतो. एमआयडीसीला परवानगी दिली जात होती. डी झोन, सेंटर दिले जात होते. त्यावेळी मी नव्हतो. ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती का पार पाडली नाही. त्यावेळचे खासदार, आमदार यांनी का लक्ष दिले नाही, असा सवालही उदयनराजेंनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार? - माण, खटाव तालुक्यांच्या दौऱ्यावर अजित पवार आले होते. तेव्हा ते म्हणाले की, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विकासकामांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत. मध्यंतरी नितीन गडकरी यांनी देखील मुख्यमंत्र्यांसह आम्हा सर्वांकडे तक्रार केली होती. काही भागातील लोकप्रतिनिधी चुकीचे वागत आहेत. त्यामुळे कामात अडचणी येत आहेत. टक्केवारीसाठी सातारा एमआयडीसीचा विकास रोखणार्या आणि खंडणीखोर गुंडांना पाठीशी घालणार्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करा, असा आदेश त्यांनी सातारच्या पोलीस अधीक्षकांना दिला होता, असे अजित पवार यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा - Sanjay Raut Reaction : लोकशाहीला टाळे ठोकण्याची वेळ; मलिक-देशमुख प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया