सातारा - माझ्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध केल्यास अजिंक्यतारा किल्ल्यावरून मी कडेलोट करून घेतो, अन्यथा आरोप करणाऱ्यांनी उडी मारावी, असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना दिले. चॅलेंज स्विकारायची तयारी नसणाऱ्यांनी यात्रेत पिपाण्या वाजवल्यासारखे बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. पालिकेच्या नवीन इमारत कामाच्या पाहणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मिशीवर हात फिरवून काही होत नसत - सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत खासदार उदयनराजे म्हणाले, हिम्मत असेल तर मी बोललेल्या गोष्टींना उत्तर द्या. फक्त मिशीवर हात फिरवून काही होत नसतं. सातारा विकास आघाडीचे सर्वच्या सर्व ५० नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास देखील खासदार उदयनराजेंनी व्यक्त केला.
मी अलगद आमदार झालो नव्हतो - माझी सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आहे. तुमच्या सारखा मी अलगद आमदार झालेलो नाही, अशी खोचक टीका खा. उदयनराजेंनी केली. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी माझे चॅलेंज स्विकारावे आणि हिम्मत असेल तर पुरावे द्यावे, असेही उदयनराजे म्हणाले.
गैर करत नाही आणि खपवूनही घेत नाही - आम्ही कोणतेही गैर काम करत नाही आणि गैर खपवूनही घेत नाही. तसे असते तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवले असते का? पाच रूपयाचा घोटाळा केला असता तर फोकस करून माझ्यावर आरोप केले असते, अशा शब्दात खासदार उदयनराजेंनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ज्यावेळी यांच्याकडे संपूर्ण सत्तास्थाने होती. २० वर्षे निर्विवाद सत्ता होती. पालकमंत्री, नगरपालिकेसह सगळे असताना त्यावेळी कामे का झाली नाहीत. कारण, त्यावेळी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता, असा आरोप उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर केला आहे.