सातारा - राष्ट्रवादीसह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर सातत्याने तोफ डागणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांची आज जिल्हा बँकेच्या संचालक पदावर अर्ज माघारीच्या दिवशी बिनविरोध निवड झाली. सोसायटी मतदारसंघातून उदयनराजे यांच्या गटातील उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीसुद्धा जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खलबते
खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेतले जाणार का? हा उत्सुकतेचा विषय होता. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि समर्थकांनी शासकीय विश्रामगृहात तळ दिला होता. तर जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत राजकीय खलबते झाली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून बैठकीत पत्रकारांना राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलची माहिती देत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभाग झाल्याचे अंतिम क्षणी जाहीर केले.
राजे समर्थकांत जल्लोष
खा. उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात ना. रामराजे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी माघार घेतली. भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही अर्ज काढून घेतल्याने शिवेंद्रसिंहराजे हेही बिनविरोध निवडून आले. त्यानंतर दोन्ही राजे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
भाजपा नेत्यांचा राष्ट्रवादीला सुखद धक्का
भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेत स्वतंत्र पॅनेल उतरविण्याची घोषणा केली होती. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी गोरे व निंबाळकर यांनी स्वतः सह आपल्या समर्थकांचे अर्ज माघारी घेतले . या अचानक माघारीचा राष्ट्रवादी नेत्यांना सुखद धक्का बसला.
रामराजेंच्या रणनीतीचे यश
रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली चतुरस्त्र रणनीती वापरत राष्ट्रवादी सहकार पॅनेलच्या अकरा जागा बिनविरोध केल्या. अत्यंत शांततेने त्यांनी उदयनराजे यांना चर्चेत थांबवून शिवेंद्रराजेंशी सूत जुळविण्याचा सल्ला दिला तर अर्ज माघारीच्या निर्णायक क्षणी त्यांनी यशस्वी शिष्टाई करत उदयनराजे यांच्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांचा होकार मिळविला. जावळी, कराड व खटाव आणि पाटण येथील जागांचा राजकीय तिढा सोडविण्याचा त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. तरीसुद्धा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व ठेवण्यात ते यशस्वी झाले.
राष्ट्रवादी सहकार पॅनेलच्या ११ जागा बिनविरोध
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या सहकार पॅनेलने 21 पैकी 11 जागा बिनविरोध जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सहा सोसायटी मतदारसंघांसह एकूण 10 जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात असून त्यासाठी राजकीय रणनीती गतिमान होणार आहे. माण, कोरेगाव, जावली, खटाव, पाटण, कऱ्हाड, महिला प्रवर्ग २ जागा, इतर मागास प्रवर्ग, नागरी बँका पतसंस्था या मतदारसंघांतील 10 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे. या एकूण दहा जागांसाठी आता वीस उमेदवार रिंगणात असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी सांगितले.
'या' असतील लक्षवेधी लढती
विशेषत: सोसायटी मतदारसंघांमध्ये घमासान लढती पहायला मिळणार आहेत. कऱ्हाड सोसायटी मतदारसंघामधून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर, खटावमधून नंदकुमार मोरे विरुद्ध माजी आमदार प्रभाकर घार्गे, माणमध्ये मनोज पोळ विरुद्ध शेखर गोरे, पाटणमध्ये गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर, कोरेगावमध्ये शिवाजीराव महाडिक विरुद्ध सुनील खत्री, जावळीत आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.