कराड (सातारा) - देवदर्शनानंतर गावी परतताना पुलाच्या कामावरील खडीवरून दुचाकी घसरल्याने येरवळे (ता. कराड) येथील एकाच कुटुबांतील चौघेजण नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. या अपघातात आजी आणि नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर सात वर्षाच्या मुलीने आपल्या पित्याला वाचविले आहे. शनिवारी सायंकाळी कराड तालुक्यातील अंबवडे-कोळेवाडी येथे ही दुर्घटना घडली. मालन भगवान यादव (57) आणि पियुष शरद यादव (4) यांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर शरद भगवान यादव आणि तनुजा यादव हे बचावले आहेत.
खडीवरून दुचाकी घसरल्याने अपघात -
शरद भगवान यादव हे आई मालन, मुलगा पियुष आणि मुलगी तनुजा यांना दुचाकीवरून घेऊन शनिवारी सायंकाळी अंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून परत येत असताना अंबवडे-कोळेवाडी येथे वांग नदीवरील जुन्या पुलाच्या कामाच्या खडीवरून दुचाकी घसरल्याने दुचाकीसह चौघेही वांग नदी पात्रात पडले. त्यातील सात वर्षांच्या तनुजाला चांगला पोहता येत होते. त्यामुळे तिने सर्वांना वाचविण्याचा प्रयत्न केला. वडील शरद यादव यांना तिने सुखरूप बाहेर काढले. मात्र, आजी आणि भाऊ खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेतून वाचलेल्या शरद यादव यांची पत्नी ही कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पोलीस कॉन्स्टेबल आहे. चार वर्षाच्या मुलाचा आणि सासूच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
सात वर्षाच्या तनुजाने वाचवला वडिलांचा जीव -
सात वर्षाच्या तनुजाने जलतरणाचा कोर्स पूर्ण केला होता. शनिवारी रात्री घटना घडली, त्या वेळी खूप अंधार होता. अशा परिस्थितीतही तनुजाने धाडसाने आपल्या वडिलांना आणि आजीला पाण्यातून ओढत बाजूला आणले. वडील बचावले परंतु आजीचा मृत्यू झाला. तसेच तिचा चार वर्षाचा लहान भाऊ डोहात बुडाला. त्यामुळे त्याला ती वाचू शकली नाही. अवघ्या सात वर्षाच्या तनुजाने दाखविलेल्या धाडसाचे कराड तालुक्यात चर्चा आहे.
हेही वाचा - सोमवारी सादर होणार अर्थसंकल्प; राज्य मंत्रिमंडळाने आयोजित केली महत्वाची बैठक