सातारा - शिवथर गावाच्या हद्दीत धोम कालव्यालगत मद्यपान करणाऱ्या दोघांना सहा जणांनी गळ्याला कोयता लावून लुटल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून एक लाख 76 हजार रुपयांची रोख रक्कम, मोबाईल, किमती घड्याळे असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटला आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मारहाण करत शस्त्राचा धाक -
सातारा तालुका पोलीस ठाण्यात अजित शिवाजी निकम (वय 43 मूळ रा. तडवळे संमत कोरेगाव सध्या रा. वाई) यांनी तक्रार दिली आहे. 18 तारखेला रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार अजित निकम व त्यांचा मित्र अमित अशोक साबळे हे शिवथर येथे धोम कालव्या नजीक, रस्त्याकडेला मद्यपान करत बसले होते. त्या वेळी दोन मोटारसायकलवरून सहा जण तेथे गेले. सर्व संशयित 20 ते 25 वयोगटातील होते. त्यांनी अजित निकम यांच्या डोक्याला कोयत्याची मुठ मारली. तर अमित साबळे याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी चोरट्यांनी अमितच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत निकम यांच्याकडे असलेली रोख एक लाख 73 हजार रुपये दोन मोबाईल, घड्याळ असा ऐवज लुटून नेला.
दरोड्याचा गुन्हा दाखल -
या घटनेमुळे निकम व साबळे भयभीत झाले. अजित निकम यांनी 20 तारखेला सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी अधिक तपास करत आहेत.