सातारा : पाटण तालुक्यातील मोरणा खोर्यात ठाणे महापालिकेचा माजी नगरसेवक आणि शिवसेनेचा माजी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख मदन कदम याने जुन्या वादातून रविवारी रात्री बेछूट गोळीबार केल्याची थरारक घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मदन कदम हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहे. त्याचा पुतण्या सध्या ठाकरे शिवसेनेचा सातारा जिल्हा प्रमुख आहे.
मोरणा खोर्यात तणाव : मदन कदम याने केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू आणि एक जण गंभीर जखमी झाल्याने मोरणा खोर्यात मोठा तणाव आहे. घटनेनंतर सातार्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख तासाभरात घटनास्थळी दाखल झाले. तसेच पाटणमधूनही मोठा फौजफाटा मोरणा-गुरेघर परिसरात दाखल झाला. हल्लेखोरास ताब्यात घेण्यात आले. तसेच मृत आणि जखमींना रात्री पाटण ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी मोठा जमाव जमल्यानंतर मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी आणि जखमीला उपचारासाठी तातडीने कराडला नेण्यात आले.
जुन्या वादातून गोळीबार : मोरणा खोर्यातील मोरणा-गुरेघर धरण परिसरात हल्लेखोर मदन कदम याची दहा-पंधरा एकर जमीन आणि फार्महाऊस आहे. जमिनीवर त्याने प्लॉटिंग केले आहे. तसेच सध्या तो फार्महाऊसमध्येच वास्तव्यास होता. पवनचक्कींसाठी या भागात जमीन खरेदीचे मोठे व्यवहार झाले आहेत. यातून वादाच्या घटना पुर्वी घडल्या होत्या. काही वाद आजही कायम आहेत. अशाच वादातून मदन कदम याने रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला आहे. मूळचा कदमवाडी-मल्हारपेठ (ता. पाटण) येथील रहिवासी असलेला मदन कदम हा ठाणे महापालिकेचा माजी नगरसेवक तसेच शिवसेनेचा सातारा जिल्हा संपर्कप्रमुख होता. उध्दव ठाकरे शिवसेनेचे विद्यमान सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम याचा तो चुलता आहे. कुटुंबीयांसह तो सध्या मोरणा भागातील फार्म हाऊसमध्ये वास्तव्यास होता.
पवनचक्क्क्यांमुळे गुन्हेगारीत वाढ : पाटण तालुक्यातील मोरणा परिसरात पवनचक्कींसाठी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदीचे व्यवहार झाले आहेत. पवनचक्क्यांची वाहने जाणार्या रस्त्यालगतच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या. पवनचक्कीची पाती घेऊन जाणारी वाहने रस्त्यातील कॉर्नरवरून जाऊ शकत नसल्याने त्या वाहनांना कॉनर्रवरील जमिनीतून वाट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यात आले होते. अशा जमिनी खरेदी करणार्यांना कॉर्नर किंग म्हटले जात होते. त्यात मदन कदम याचाही समावेश होता.
दाखल झाला होता गुन्हा : शिविगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मदन कदम आणि त्याच्या दोन्ही मुलाविरूध्द चारच दिवसांपुर्वी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मोरणा प्रकल्पानजीकच्या रस्त्यावर वाहनांच्या कारणावरून वादावादी होऊन मदन कदमसह त्याच्या मुलांनी शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच एका वाहनाची काचही फोडली होती. याप्रकरणी सखाराम जाधव यांनी पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून मदन कदम, गौरव मदन कदम आणि सोनू उर्फ योगेश मदन कदम यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता.