सातारा - कोरोना महामारीला हाताळण्यात सध्या प्रशासन व्यस्त आहे. याचाच फायदा घेत बीड जिल्ह्यात चोरून दोन बालविवाह उरकरण्यात येणार होते. मात्र, साताऱ्याच्या लेक लाडकी अभियान राबणाऱ्या संस्थेस हे बालविवाह रोखण्यात यश आले आहे. या अभियानाच्या संचालिका अॅड. वर्षा देशपांडे यांनी तत्परता दाखवत पोलिसांच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हे बालविवाह रोखले आहेत.
तिला शिकून वकील व्हायच आहे-
बहुसंख्येने ऊसतोड कामगार असलेल्या बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यात बालविवाहांची मोठी समस्या आहे. गेली काही वर्षे साताऱ्यातील लेक लाडकी अभियानाच्या संचालिका अॅड. वर्षा देशपांडे बालविवाहाविरोधात शिरुरकासार तालुक्यात काम करतात. इयत्ता ११ वीत शिकत असलेली १७ वर्षांची वैशाली (नाव बदलले आहे.) शाळेच्या दिवसात 'लेक लाडकी अभियान' आणि यूएनएफपीएच्या बालविवाह रोखून मुलींना स्वयंपूर्ण करण्याच्या एका प्रकल्पामध्ये सक्रिय होती. वडील नसल्याने आईसह मामाच्या आधाराने ती एका दुर्गम वाडीत राहते. विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन वकील व्हायचे तिचे स्वप्न आहे. वक्तृत्व स्पर्धा आणि पथनाट्याबरोबरच ती अभ्यासातही हुशार आहे. मात्र तिलाच या बालविवाहाच्या संकटाला सामोरे जावे लागणार होते.
वैशाली व तिच्या आईचा होता विरोध
लॉकडाऊनमुळे २० लोकांच्या उपस्थितीची अट असल्याने लग्न स्वस्तात होते. बऱ्याचदा मुलाकडील लोकांकडूनच काही रक्कम पदरात पडते. वैशालीच्या मामानेही तिच्यासाठी पैठणहून स्थळ आणले आणि लग्नाची तयारी सुरू केली. वैशाली आणि आईने त्याला विरोध केला, पण त्यांना गप्प बसवले गेले. बहिणीचा बालविवाह झाल्याने तिच्या आयुष्याची झालेली फरफट वैशाली बघत होती. हट्ट करून, रडूनही मामाला पाझर फुटत नाही म्हटल्यावर तिने 'लेक लाडकी अभियाना'च्या अॅड. वर्षा देशपांडे यांना या घडामोडींचा एक संदेश पाठवला. त्यानंतर चक्रे हलली.
'लेक लाडकी'ने घेतली जबाबदारी
अभियानाकडून तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हाधिकारी, शिरुरकासार पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. चाइल्ड हेल्प लाइनवरही तक्रार नोंदवली. ४ एप्रिलला चाइल्डलाइनकडून वाडीच्या ग्रामसेवकांना तातडीने पत्र गेले. बुधवारी, ५ एप्रिल रोजी महिला पोलिसासह सरिता आणि तिच्या पालकांना बीडला बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगून हा विवाह रोखला गेला. लॉकडाउन संपताच तिचे पुढील शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी लेक लाडकी अभियान उचलणार आहे.