सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असताना पाटण तालुक्यातील उरुल या ठिकाणी मोराची शिकार झाली आहे. याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विनायक बाळासो निकम (वय 42), राहुल बाळासो निकम (वय 41) यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. त्या दोघांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शनिवारी 11 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 7 वाजता वाजण्याच्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उरुल, ता. पाटण येथील गुरवकी नावाच्या मालकी क्षेत्रात एक मोर (लांडोर ) या राष्ट्रीय पक्षाची शिकार झाली असल्याची माहिती मिळली. त्यानंतर लगेच मल्हारपेठचे वनपाल संजय भाट, वनरक्षक रामदास धावटे, बर्गे हे तिघेही घटनास्थळी पोहोचले.
त्यावेळी संशयीत आरोपी विनायक बाळासो निकम याच्या शेतातील पत्र्याच्या शेडजवळ टीव्ही ज्युपिटर ( एम. एच. 50. के -9322 ) या गाडी शेजारी मृत लांडोर (मोर ) आणि डबल बार बंदूक असे साहित्य मिळून आले. ते सर्व साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळी आरोपी विनायक बाळासो निकम राहुल बाळासो निकम हे देखील त्याच्यासोबत होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांच्यावर भारतीय वन्यजीव, अधिनियम 1972 चे कलम 9 ,39 ,44,48-1 व 451 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपसंरक्षक भारतसिंह हाडा, किरण कांबळे याच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनरक्षक विलासराव काळे, वनपाल संजय भाट, रामदास धावटे, दादाराव बर्गे, विलास वाघमारे हे अधिक तपास करत आहेत.