सातारा - खटावमधील वडूज येथील शहा पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या प्रकाश बागल (रा. येरळवाडी, ता.खटाव) यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
बांधकामासाठी काढले होते पैसे
या घटनेने वडूज शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, की प्रकाश बागल यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी सोमवारी वडूज येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतून ठेकेदाराला देण्यासाठी अडीच लाख रूपये काढले होते. त्यानंतर ते वडूज-कराड रस्त्यावरील शहा यांच्या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.
पाळत ठेवून साधला डाव
यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने ते पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्याशी बोलण्यात दंग असल्याचा गैरफायदा घेत त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले अडीच लाख रूपयांची रोकड असलेली पिशवी लंपास केली. भरदिवसा घडलेला या चोरीच्या प्रकाराने वडूज शहरात खळबळ उडाली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करत आहेत.
चोरटा दुचाकीवरून पसार
चोरीनंतर चोरटा दुचाकीवरून त्याच्या साथीदारासोबत पळून गेल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहे. या चोरट्याबाबत माहिती मिळाल्यास तातडीने वडूज पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मालोजीराव देशमुख यांनी केले आहे.