सातारा - देगाव (ता.सातारा) हद्दीत देगाव ते निगडी जाणार्या रस्त्यावर 1 जून रोजी एका अज्ञात युवकाचा डोक्यात दगड घालून खून झाला होता. याप्रकरणी त्याचेच मित्र गणेश सोनार मुर्म व राजेश बुधान टुडू या दोघांना सातारा शहर पोलिसांनी सोमवारी (दि. 15 जून) अटक केली आहे. दोन्ही आरोपी हे झारखंडचे आहेत.
राजु मुर्म असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. 1 जून रोजी देगाव-निगडी रस्त्यावर एका युवकाचा मृतदेह सापडला होता. डोक्यात दगड घालून खुन केल्याने मृताची ओळख पटवत नव्हती. पोलिसांनी मृत व्यक्ती परप्रांतीय असल्याचा निष्कर्ष काढून औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या काही परप्रांतीय लोकांना तपासाच्या केंद्रस्थानी ठेवले होते. वर्णे (ता. सातारा) येथे एक परप्रांतीय युवक संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, अनिल पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने राजेश या मित्राच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीसांनी राजेशला लिंब (ता. सातारा) येथून अटक केली.
खून करण्याच्या एका दिवसा पूर्वी मृत व संशयितांनी एकत्र दारू घेतली होती. घरगुती कारणावरून संशयित व मृत राजु यांच्यात वाद झाला होता. संशयितांनी मृत व्यक्तीला देगाव-निगडी परिसरात नेले. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. तसेच मृताची ओळख पटू नये यासाठी त्याच्या खिशातील ओळखपत्र, मोबाईल लंपास केला होता, अशी कबुली त्यांनी दिली.
हेही वाचा - उद्योजकांनी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्यावे.. शंभूराज देसाई यांचे आवाहन