सातारा - लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन नर्मदा स्कूलच्या अंधारात वाटमारी करत 37 हजारांची लूटमार करणाऱ्या दोघांच्या शाहूपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही संशयितांची न्यायालयाने पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
लिफ्ट मागण्याचा केला बहाणा
दत्तात्रय उत्तम घाडगे (रा. सुर्यवंशी काॅलनी, दौलतनगर) व लाल्या उर्फ मयुर काशिनाथ राठोड (रा. आकाशवाणी झोपडपट्टी), अशी संशयितांची नावे आहेत. 26 नोव्हेंबरला भूविकास बँक चौकामध्ये लिप्ट मागण्याचा बहाणा करुन या दोघांनी एका दुचाकीस्वाराला नर्मदा स्कुलजवळ, आंधारात नेले. तिथे चाकुचा धाक दाखवत मारहाण करुन तक्रारदाच्या मोटारसायकलसह 42 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला.
सराईताचे नाव आले पुढे
तपासात हा गुन्हा एका सराईत चोरट्याने साथिदाराच्या मदतीने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते दोघेही पुण्याला गेल्याचे समजल्यानंतर पोलीस पथक पुण्याला गेले. मात्र, संशयित वारंवार आपली ठिकाणे बदलत असल्यामुळे ते हाती लागत नव्हते. त्यानंतर संशयित व्याजवाडी (ता.वाई) येथे असल्याची माहिती मिळाली.
व्याजवाडीतून पहाटे अटक
पोलिसांनी सापळा लावत व्याजवाडी येथून पहाटे संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 मोबाईल, मोटार सायकल, दोन पाकीटे, एटीएम कार्ड, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेला चाकू, असा 38 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
हेही वाचा - 'बोटे मोडून सरकार बदलत नसते'