सातारा - दिवसेंदिवस सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज (रविवार) आलेल्या अहवालात 76 जणांना कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोराबाधितांची संख्या ही आता 2 हजार 289 झाली आहे.
जिल्ह्यात प्रवास करुन आलेले 2, निकट सहवासित 53, सारी 11, इतर 1 आणि विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या अँटिजन टेस्ट किटद्वारे 9 असे एकूण 76 संशयितांचा अहवाल कोरोनाबाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. वाई तालुक्यातील 13, सातारा 11, कराड 11, खंडाळा 3, कोरेगांव 5, खटाव 2, पाटण 7, फलटण 15, माण 6 व जावळी तालुक्यात 4 कोरोनाबाधित आढळले आहेत.
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात शिरवळ (ता. खंडाळा) येथील 90 वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
दरम्यान, एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 2 हजार 289 झाली असून, 923 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेर. आजपर्यंत 81 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1 हजार 285 आहे.
60 जण कोरोनामुक्त -
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 रुग्णांना दहा दिवसानंतर आज घरी सोडण्यात आले. एकूण 471 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून, पुणे व कराड येथे तपासणीसाठई पाठवण्यात आले आहेत.