कराड (सातारा) - राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला आणि सांगली जिल्ह्यातील आटपाटी येथून चोरीला गेलेला 16 लाखांचा बकरा अखेर रविवारी (दि. २७) रात्री कराडजवळच्या वनवासमाची गावात सापडला आहे. बोकड चोरीप्रकरणी आटपाडीतील दोन आणि कराडमधील एक, अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.
आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेला 16 लाखांचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. त्याला आटपाडीच्या बाजारात मोदी बकऱ्याला 70 लाख रुपये इतक्या दराने मागणी झाली. पण, तो मालकाने विकला नाही. मात्र, त्यातील 16 लाखांचा बकरा आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला होता. हा बकरा 16 लाखाच्या किंमतीमुळे चर्चेचा ठरला होता. त्यामुळे संशयितांनी हा बकरा चोरण्याचा डाव आखला. बकरा चोरून त्याला चारचाकी मोटारीतून कराडला आणले. कराडजवळच्या वनवासमाची गावाच्या बाहेर असलेल्या डोंगराच्या पायथ्याला एका घरात या बकऱ्याला कोंडून ठेवण्यात आले होते.
सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी घेतला मोटारीचा शोध
आटपाडी पोलिसांनी एका चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना मोटारीतून बकरा नेला असल्याचे दिसून आले. सीसीटीव्हीत गाडीचा नंबर दिसत नसताना केवळ गाडीच्या वर्णनावरून आटपाडीतील एका संशयित मोटारीची तपासणी केली. गाडीचे दार उघडल्यानंतर बकऱ्याचा एक विशिष्ट प्रकारचा वास पोलिसांना आला. त्यामुळे 16 लाखांचा बकरा याच गाडीतून नेला असल्याचे स्पष्ट झाले. गाडी मालकास पोलीस ठाण्यात आणून त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच अन्य दोन संशयितांची नावे सांगितली. चोरलेला बकरा कराडजवळच्या वनवासमाची गावात बांधून ठेवला असल्याची माहितीही दिली.
विकण्याच्या हेतूने केली होती बकऱ्याची चोरी
संशयीताने दिलेल्या माहितीनुसार आटपाडी पोलिसांचे एक पथक रविवारी (दि. 27 डिसें.) रात्री वनवासमाची गावात पोहोचले. त्यांनी डोंगरालगतील एका घरावर छापा मारला. त्यावेळी त्यांना तेथे बांधून ठेवलेला बकरा आढळला. बकरा ताब्यात घेऊन पोलीस आटपाडीकडे रवाना झाले. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांनी हा बकरा विकण्याच्या हेतूने चोरला होता, असे आटपाडीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - देहविक्रयासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका ; वाईतील लॉजवर छापा
हेही वाचा - सांगलीचा १६ लाखांचा बोकड चोरट्यांनी अलिशान कारमधून पळवला