सातारा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग नियंत्रण कायदा लावला आहे. या काळात जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा भंग करुन सातारा शहरात खासगी वाहनातून प्रवेश करू इच्छिणाऱ्या बारामती आणि कोथरुडच्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अनुष्का राहूल देशपांडे (वय 20, रा. कोथरुड, पुणे) आणि अमोल जयसिंग सकटे (वय 35), प्रियांका अमोल सकटे (वय 25, रा. कसबा, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अमोल व त्यांची पत्नी छोट्या मुलासह महामार्गावरुन वाढेफाटा येथे स्वत:च्या मोटारीतून आले. सातारा शहरातील कुपर कॉलनीमध्ये ते निघाले होते.
दुसऱ्या एका घटनेत अनुष्का देशपांडे ही युवती स्वत:च्या मोटारीतून सिव्हील हॉस्पिटल शेजारी असलेल्या सदरबझार येथे आई आणि बहिणीकडे निघाली होती. कोथरुड येथून ती आली होती. या दोन महिलांसह तिघांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले.