सातारा - दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँके विरोधात लाखो रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी बँकेविरोधात तक्रारी दिल्या आहेत.
तक्रारी केलेल्या तीन घटना २०१६ ते २०१८ या काळात घडल्या आहेत. राहूल सुधाकर नलावडे (रा.वाढे ता. सातारा) यांनी पहिली तक्रार दिली आहे. जावळी सहकारी बँकेचे कर्ज विभाग प्रमुख रविंद्र संपत देशमुख, व्यवस्थापक पवार, चेअरमन चंद्रकांत गावडे, संचालक मंडळ, कर्ज व्यवस्थापक यांनी राहूल नलवडे यांच्या 'आरटीजीएस'साठी घेतलेल्या सही केलेल्या कोर्या धनादेशाचा गैरवापर केला. त्यांच्या खात्यावरील १६ लाख रुपये परस्पर वर्ग केले व दुसर्या कोर्या धनादेशाचा गैरवापर करुन ६ लाखांची रक्कम कुलकर्णी नावाने काढून अपहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ज्योती विशाल नलावडे (वय ३६, रा.सदरबझार) यांनी दुसरी तक्रार केली आहे. बँकच्या सातारा शाखेचे तत्कालीन व्हाईस चेअरमन शैलेंद्र दत्तात्रय जाधव व काही संचालकांविरुध्द त्यांनी तक्रार दिली. आरोपींनी तक्रारदार महिलेचे पती व दीर यांच्या खात्यातील ३३ लाख रुपये अपहार करून त्यांच्या खात्यातील ८ लाख ४० हजार रुपये परत करण्यास टाळाटाळ केली.
तिसरी तक्रार विशाल नलावडे यांनी सातारा शाखेचे रविंद्र देशमुख, चेअरमन गावडे व संचालक मंडळाविरुध्द दिली आहे. तक्रारदाराने आरोपी रविंद्र देशमुख याच्याकडे विश्वासाने खात्यावर भरण्यासाठी ११ लाख रुपये दिले होते. मात्र, त्याने पैसे खात्यावर भरले नाहीत. संबंधित रक्कम इतर आरोपींनी माघारी देतो, असे आश्वासन दिले. मात्र त्यांनीही ती रक्कम परत मिळवून दिली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.