सातारा- किल्ले लग्नासाठी भाड्याने देण्यात गैर काय, उलट त्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदाच होईल, असे विधान सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे. उदयनराजे यांनी राज्य सरकारच्या किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाचे समर्थन केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
‘एका वाहिनीला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये किल्ल्याबद्दलच्या सरकारच्या निर्णयाला माध्यमांनी वेगळे रूप दिल्याचे उदयनराजे म्हणाले आहेत. अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. आपल्याकडे मंदिरांमध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले पर्यटन आणि इतर कार्यक्रमांसाठी देण्यास काही हरकत नाही. त्यामुळे पर्यटन वाढून अर्थव्यवस्थेला फायदाच होईल, असे उदयनराजे म्हणाले आहेत.
हेही वाचा- मौका सभी को मिलता है, अमोल कोल्हेंचा युतीला इशारा
राज्य सरकार आपल्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच जनतेमधून देखील मोठा विरोध करण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे काही होणार नसल्याचे माध्यमांना सांगितले होते. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच सरकारच्या निर्णयाचे समर्थन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. छत्रपती उदयनराजे भाजपमध्ये गेल्याने त्यांनी आपली भूमिका बदलल्याची टीका सोशल मीडियामधून करण्यात येत आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात सरकारची कोट्यावधींच्या घोटाळ्यांची उड्डाणे; अनंत गाडगीळांचा हल्लाबोल