सातारा - पाटण तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मोरगिरी, पाटण, नवारस्ता, मल्हारपेठ आणि आता ढेबेवाडीतील दुकाने चोरट्यांच्या हिटलिस्टवर आल्याने या चोरीमागे एक टोळी असण्याची दाट शक्यता आहे. या सततच्या चोऱ्यांमुळे पाटण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी करताना चोर सीसीटीव्हीसमारे आपला चेहरा लपवून चोरी करत असल्याने या चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुका या मतदारसंघावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यात आतापर्यंत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याने मोठी खळबळ माजली आहे. याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पोलीस प्रशासनाला काय सूचना देतात, याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - 'सातारा शहरातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार'
पाटण तालुक्यातील विविध विभागांमध्ये चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. एकाच आठवड्यात चोरट्यांनी मोरगिरी, पाटण, नवारस्ता, मल्हारपेठ, ढेबेवाडी विभागातील अनेक दुकाने फोडली आहेत. सुरूवातील मोरगिरी विभागावर चोरट्यांनी लक्ष करून तेथील 3-4 दुकाने फोडली. मोरगिरी स्टँड परिसरात स्टेशनरी, पानटपरी व अन्य एका दुकानावर चोरट्यांनी एका दुकानातून 6 हजार रुपये चोरले. तर इतर 2 दुकानात चोरट्यांना काहीच हाती लागले नाही.
तिसऱ्या दिवशी सोमवारी सकाळच्या सुमारास पाटणमध्ये दिवसाढवळ्या विनायक ज्वेलर्स या दुकानात चोरट्याने डल्ला मारला. यामध्ये तब्बल 3 किलो 800 ग्रॅम चांदीचे दागिने (95 लहान-मोठ्या आकाराचे पैंजन) आणि 30 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवजाची बॅग चोरट्याने गायब केली. या चोरीची सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही.
हेही वाचा - महसूल विभागाकडून शेतकऱ्यांची पिळवणूक, स्वाभिमानीकडून आंदोलनाचा इशारा
पाटणनंतर त्याचदिवशी रात्रीत चोरट्यांनी नवारस्ता आणि मल्हारपेठ विभागात तब्बल 3 दुकाने फोडली. पाटण-कराड रस्त्यालगत मल्हारपेठ येथे सिध्दनाथ बझारचे शटर उचकटून सुमारे 3 हजार 500 रुपयांची चोरी करण्यात आली. तसेच युनिक गॅरेजमधील चोरट्यांनी साहित्य विसकटले. नवारस्ता येथील टायरचे दुकान अशा तिन्ही ठिकाणच्या दुकानांत चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर आता ढेबेवाडी विभागातील तब्बल 7 दुकाने चोरट्यांनी हिटलिस्टवर घेत पाटण तालुक्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
ढेबेवाडीत मुख्य बाजारपेठेत दुमजली पाटील व्यापारी संकुलातील 7 दुकाने शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडली. या सातही दुकानांची शटर उचकटण्यात आली आहेत. यामध्ये सोनल क्लॉथ स्टोअर्समधून 10 हजार आणि लगतच्या राजस्थान स्वीट मार्ट दुकानातून 50 हजार असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या झालेल्या सर्व चोऱ्यांमध्ये चोरट्यांकडून केवळ दागदागिने आणि रोख रक्कमेवरच डल्ला मारला जात आहे. दुकानातील इतर साहित्याला हात देखील लावला जात नसल्याचे समोर आले आहे.
वरील सर्व चोरींची नोंद ही त्या त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे. मात्र, अद्याप या चोरीप्रकरणातील एकाही आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे मोरगिरी, पाटण, नवारस्ता, मल्हारपेठ, ढेबेवाडी आणि नंतर पुढे कोणत्या विभागावर चोरट्यांचे लक्ष असणार? सलग होणाऱ्या चोऱ्यांमुळे चोरट्यांना पोलिसांची भिती राहिलेली नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.