सातारा - जखमी अवस्थेत सापडलेल्या पांढर्या मानेच्या करकोचाला (व्हाईट नेकड स्टोर्क) जीवदान मिळाले. शेतकर्याची सतर्कता आणि पक्षीमित्रांनी तातडीने हालचाली करत पक्षी तज्ज्ञांमार्फत उपचार केल्यामुळे हे जीवदान मिळाले आहे.
हेही वाचा- भीम अॅप प्रथमच चालणार विदेशातही; सिंगापूर आणि फिक्कीत सामंजस्य करार
कराड तालुक्यातील कार्वे या गावातील एका शेतात विजय वायदंडे या शेतकर्याला सोमवारी पांढर्या मानेचा करकोचा जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला उडता येत नव्हते. वायदंडे यांनी कराडातील पक्षीमित्र आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचा मोबाईल नंबर शोधून काढला. भाटे यांच्याशी संपर्क साधून करकोचाला घेऊन ते कराडला आले. भाटे यांनी कराडमधील पक्षीतज्ज्ञ आणि निष्णात अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुध्द दीक्षीत यांच्यामार्फत करकोचाच्या पायाची तपासणी केली. त्याच्या पायाला जखम झाली होती. तसेच पायाचे हाड फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे करकोचाच्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले. मल्टी व्हिटॅमिन, कॅल्शियम सप्लिमेंटसह ताजे मासे त्याला खायला देण्यात आले. साधारन तीन आठवडे करकोचाच्या पायाला प्लॅस्टर ठेवावे लागणार आहे. त्यामुळे पक्षीमित्र रोहन भाटे हेच त्या करकोचाची देखभाल करत आहेत. पांढर्या मानेच्या या करकोचाला इंग्रजीमध्ये व्हाईट नेकड स्टोर्क असे म्हणतात. या जखमी पक्ष्याची नोंद भाटे यांनी कराड वनपरिक्षेत्रात केली आहे. डॉ. दीक्षित आणि रोहन भाटे यांनी आतापर्यंत अनेक दुर्मिळ प्रजातीतील जखमी पक्ष्यांवर उपचार करुन जीवदान दिले आहे. त्या संदर्भातील त्यांचे संशोधनपर लेखही शासकीय मासिकांमध्ये प्रसिध्द झाले आहे.