सातारा - सिक्कीमचे माजी राज्यपाल, आणि सातारचे नवनिर्वाचित खासदार असलेल्या श्रीनिवास पाटील हे आपल्या झुबकेदार मिशांसाठीदेखील प्रसिद्ध आहेत. सनदी अधिकारी असल्यापासून त्यांनी ठेवलेल्या या मिशा ही त्यांची ओळखच बनली आहे. मिशी ताठ असणे, ही आपल्याकडे गर्वाची आणि अभिमानाची बाब मानली जाते.
साताऱ्यामध्ये यंदा विधानसभा निवडणुकीसह लोकसभेची पोडनिवडणूकही पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीचा अर्ज भरायला जाताना उमेदवाराचे औक्षण करण्याची आपल्याकडे पध्दत आहे. श्रीनिवास पाटील हे अर्ज भरायला जात असताना, त्यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी त्यांनी श्रीनिवास यांना सांगितले होते, की या मिशा अशाच ताठ राहूद्या.
श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली. साताऱ्याचे उदयनराजे यांचा पराभव करत त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, रजनीदेवी यांनी विजयाचा पहिला गुलाल आपल्या सासूबाईंच्या कपाळी लावला. कारण, 'पीपल्स गव्हर्नर' अशी ओळख असलेल्या श्रीनिवास यांच्या मिशा या निकालानंतरही ताठ राहिल्या होत्या.
हेही वाचा : साताराचे नवे खासदार शरद पवारांच्या भेटीला